18 October 2018

News Flash

राजस्थानमध्ये ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत तरुणाची हत्या, जाळतानाचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी शंभूनाथला अटक केली आहे

हत्या करतानाचा आणि त्यानंतरच मृतदेह जाळतानाचा व्हिडिओ शूट करणे ही एक प्रकारची विकृतीच

‘लव्ह जिहाद’वरुन तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील राजसमंद येथे घडली. तरुणाची हत्या करताना तसेच त्याला जाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्या करणाऱ्यांनीच हा व्हिडिओ शूट केला असून, या व्हिडिओत एक तरुण लव्ह जिहादवरुन धमकी देताना दिसतो आहे. ‘लव्ह जिहाद थांबवले नाही तर जिहादींची अशीच अवस्था केली जाईल’ अशी धमकी त्याने दिली आहे.

राजसमंद येथील एका हॉटेलपासून जवळच निर्जन रस्त्यालगत बुधवारी अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. याच सुमारास राजसमंदमध्ये ‘लव्ह जिहाद’चा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी या व्हिडिओत जाळलेल्या तरुणाचाच मृतदेह सापडल्याचे स्पष्ट केले. मोहम्मद शेख असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मजूर म्हणून काम करत होता. तर त्याची हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव शंभूनाथ रायगर असे आहे. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी शंभूनाथला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशभरात संतापाची लाट उसळली. दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण होता, त्यानेच हा सर्वप्रकार मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला आहे. पोलीस त्याचाही शोध आहेत. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही करण्यात आली आहे.

हत्या करतानाचा आणि त्यानंतरच मृतदेह जाळतानाचा व्हिडिओ शूट करणे ही एक प्रकारची विकृतीच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. व्हिडिओत शंभूनाथ लव्ह जिहादबाबत भाष्य करतो. ‘आमच्या देशात लव्ह जिहाद थांबवा. अन्यथा तुमची अशीच अवस्था होईल’, अशी धमकीच त्याने दिली आहे. या प्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत. या घटनेनंतर उदयपूर आणि परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

First Published on December 7, 2017 12:50 pm

Web Title: rajasthan labourer hacked to death in rajsamand video viral love jihad case accused arrested sit formed