देशभरात स्वयंघोषित संस्कृती रक्षकांच्या उच्छादाच्या घटना ताज्या असतानाच राजस्थानमध्ये एका मनोरूग्ण महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील नागूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती एका मनोरूग्ण महिलेवर ‘अल्ला’, ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ बोलण्याची सक्ती करताना दिसत आहेत. या दोघांचेही चेहरे कपड्याने झाकलेले आहेत. या दोघांनी रस्त्यावरील एका महिलेला पकडले असून ते सुरूवातीला तिला ‘अल्ला’ बोलण्याची सक्ती करताना दिसत आहेत. मात्र, तिला ‘अल्ला’ हा शब्द उच्चारता न आल्यामुळे या दोघांनीही तिला पाईप आणि लाथांच्या साह्याने मारहाण केली. त्यावेळी ही महिला भीतीने दोघांपुढे गयावया करताना दिसत आहे. त्यानंतर या दोघांनीही महिलेला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ बोलण्याचीही सक्ती केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना आजुबाजूचे लोक हसत या सगळ्याची मजा घेत आहेत. ‘एएनआय’च्या माहितीनुसार, १३ जून रोजी ही घटना घडली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून महिलेला मारहाण करणाऱ्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांचीही ओळख पटली असून त्यांची नावे प्रकाश आणि श्रवण अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.