एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले राजस्थानचे मंत्री बाबूलाल नागर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये दुग्धोत्पादन आणि खादी उत्पादन राज्यमंत्री असलेल्या नागर यांनी या महिलेला आपल्या निवासस्थानी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
‘‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आणि तथ्यहीन आहेत. या आरोपाचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा यासाठी नैतिकता म्हणून मी राजीनामा देत आहे. या तपासातून सत्यच बाहेर येईल आणि मी निर्दोष असल्याचे सिद्ध होईल,’’ असे नागर यांनी सांगितले.
‘‘आज सकाळीच मुख्यमंत्री कार्यालयाकडे मी राजीनामा पाठवला आहे. खूप विचार करून मी राजीनामा दिला आहे. हा निर्णय सर्वस्वी माझा असून, मला कोणीही राजीनामा देण्यास सांगितले नाही,’’ असे नागर म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री गेहलोत एका कार्यक्रमासाठी बारमेर येथे गेले असल्याने नागर यांच्या राजीनाम्याविषयी त्यांना काहीही माहीत नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.
नेमके काय घडले?
नोकरी देण्याचे आमिष दाखवून नागर यांनी ११ सप्टेंबर रोजी या महिलेला जयपूरमधील आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावले. त्यानंतर तिला धमकावून आणि मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. या महिलेने सोडाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण राज्याच्या सीआयडी-गुन्हे विभागाकडे सोपविण्यात आले असून,  बुधवारी त्यांनी चौकशीला सुरुवात केली. या महिलेचा जवाब नोंदवून घेण्यात आला असून, गुन्हा घडला त्या दिवशी तिने परिधान केलेले कपडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.