राजस्थानामधील आयएएस अधिकाऱ्यांना भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर आधारित पुस्तकाचा अभ्यास करावा लागण्याची शक्यता आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना सुशासनावर (गुड गव्हर्नंस) आधारित केलेल्या भाषणांवर एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे. ‘चिंतन शिबीर’ असे या पुस्तकाचे नाव असल्याचे राजस्थान सरकारचे कार्मिक सचिव भास्कर सावंत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांनी हे पुस्तक गुजरात सरकारला पाठवले असून सरकारच्या औपचारिक स्वीकृतीनंतर आयएएस अधिकाऱ्यांना ते वितरीत करण्यात येतील. परवानगीसाठी फाईल पुढे पाठवण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले. राजस्थानच्या मुख्य सचिवांनी गुजरातचे त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांकडे ती पाठवण्यात आली आहे. मोदी हे २००१ ते २०१४ या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या भाषणांचे हे संकलन आहे. यामध्ये त्यांनी सुशासन, निर्णय क्षमता, वेळेचे नियोजन आदी विषयांवर भाष्य केले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांसाठी ‘एक्जाम वॉरियर्स’ पुस्तक लिहिले होते. याची मोठी चर्चाही झाली होती. मोदींच्या भाषणशैलीचे मोठे कौतुक केले जाते. परंतु, विरोधी पक्षाकडून यावर नेहमी टीका केली जाते.