राजस्थानमध्ये ‘स्वच्छ भारत अभियानाच्या’वेळी काही अतिउत्साही आणि अतिरेकी सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जयपूरच्या प्रतापगढ येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. यावेळी स्थानिक नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि काही कर्मचारी स्वच्छ भारत अभियानाचे काम करत होते. मात्र, मुख्याधिकारी आणि अधिकाऱ्यांनी अतिउत्साहाच्या भरात उघड्यावर शौचाला बसलेल्या एका महिलेची छायाचित्रे काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी या ठिकाणी असलेल्या जाफर  हुसैन याने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी जाफर हुसैन यांना जबर मारहाण केली. जखमी खान यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले, परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक जैन आणि कमल हरिजन, रितेश हरिजन , मनिष हरिजन यांच्यासह ५ जणांविरुद्ध कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती प्रतापगढ पोलीस ठाण्याचे अधिकारी मंगी लाल बिष्णोई यांनी दिली. दरम्यान, जैन यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जाफर हुसैन यांच्या भावाने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, कच्छी बस्ती मेहताब शाह कॉलनीतील परिसरात सकाळी साधारण सहा ते साडेसहाच्या सुमारास काही महिला उघड्यावर शौचाला बसल्या होत्या. त्यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कारने त्याठिकाणी आले. यावेळी त्यांच्याबरोबर कमल हरिजन, रितेश हरिजन , मनिष हरिजन या तिघांसह नगर परिषदेचे अन्य कर्मचारीही होते. या सगळ्यांनी याठिकाणी उघड्यावर शौचाला बसलेल्या महिलेची छायाचित्रे काढण्यास सुरूवात केली. त्यावेळी माझा भाऊ जाफर याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरूवात केली. हा प्रकार घडला तेव्हा संबंधित महिलेसह सर्वजण त्याठिकाणी उपस्थित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मात्र, याबद्दल आयुक्त अशोक जैन यांना विचारण्यात आले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून याठिकाणी उघड्यावर शौचाला बसलेल्या लोकांना उठवायला गेलो होतो. आम्ही गाडी पार्क करून त्याठिकाणी असलेल्या लोकांना उघड्यावर शौचाला बसल्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत होतो. त्यावेळी अचानकपणे एक माणूस आमच्या दिशेने आला आणि त्याने आमच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तो निघून गेल्यानंतरही आमचे काम सुरूच होते. त्यानंतर आम्ही त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलो असता त्याचा मृत्यू झाल्याचे आम्हाला समजले. आम्ही कोणतीही आक्षेपार्ह छायाचित्रे काढली नाहीत किंवा कोणाला मारलेही नाही. आमच्याशी हुज्जत घालून हा माणूस निघून गेला तेव्हा तो पूर्णपणे व्यवस्थित होता, असा दावा जैन यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी जैन यांचीही तक्रार दाखल करून घेतली आहे. जाफर खान यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.