राजस्थानच्या कोटा येथील सरकारी रुग्णालयात कुटुंबातील व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वॉर्डमधला कूलर सुरु करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीने चक्क व्हेंटिलेटरचा प्लग काढला, महाराव भीम सिंह या रुग्णालयात दाखल झालेल्या ४० वर्षीय रुग्णाचा या घटनेत मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

१३ जून रोजी रुग्णाला करोनाची लागण झाल्याच्या संशयातून कोटा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र चाचणी केल्यानंतर  या रुग्णाला करोनाची लागण झालेली नसल्याचं निष्पन्न झालं. यानंतर रुग्णालयातील आयसीयूमधील एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचं कळताच, डॉक्टरांनी रुग्णाला दुसऱ्या वॉर्डात हलवलं. या वॉर्डात उकाडा होत असल्यामुळे रुग्णाच्या कुटुंबाने कुलरची सोय केली…मात्र कुलरसाठी सॉकेट न सापडल्यामुळे कुटुंबातील व्यक्तीने चक्क व्हेंटीलेटरचा प्लग काढला. अर्ध्या तासानंतर व्हेंटीलेटरची पॉवर संपल्यानंतर रुग्णाला त्रास व्हायला लागला.

डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती देताच, त्यांनी रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत या रुग्णाचा मृत्यू झाला होता अशी माहिती, अधीक्षक डॉ. नवीन सक्सेना यांनी दिली. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी मुख्य अधीक्षक, नर्सिंग अधिक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या समितीची स्थापना करण्यात आलेली असून लवकरात लवकर हा अहवाल दिला जाणार आहे. अहवालात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल अशीही माहिती यावेळी प्रशासनाने दिली आहे.