SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रेडिट कार्ड घोटाळा राजस्थान पोलिसांनी उघड केला आहे. जोधपूर पोलिसांनी एका दुकानावर छापा मारून तिथून शेकडो क्रेडिट कार्डस् जप्त केली आहेत. एवढेच नाही तर एका माणसालाही अटक केली आहे. या दुकानातून सिम कार्डस्, स्वाइप मशीन्सही पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी ज्या माणसाला अटक करण्यात आली त्याची चौकशी केली असता अनेकांनी माणसांनी मला बिल भरण्यासाठी आणि पैसे गुंतवण्यासाठी क्रेडिट कार्ड दिले होते असे त्याने सांगितले आहे. मात्र यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या माणसाची कसून चौकशी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आमच्याशी संपर्क करून आम्हाला क्रेडिट कार्डासंदर्भात काही घोटाळा झाल्याचे सांगितले. आम्हाला मिळालेल्या माहितीनंतर आम्ही एका दुकानावर छापा मारला. तिथे आम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाची क्रेडिट कार्ड मिळाली आहेत. आम्ही या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या माणसाची चौकशी करण्यात येते आहे. अशी माहिती डिसीपी कमल सिंग तन्वर यांनी दिली आहे.