आपल्या सभोवताली अचंबित करणाऱ्या अनेक गोष्टी घडताना आपल्याला पहायला मिळाल्या असतील. राजस्थानमधील भिलवाडा येथे झालेल्या एका हत्याकांडाचा छडा नुकताच पोलिसांनी लावला आहे आणि त्यातून जे सत्य समोर आलंय त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. मृत व्यक्तीने स्वत:चाच खुन करण्याची सुपारी दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. मृत व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी स्वत:चाच खुन करूवून घेतला.
भिलवाड्यातील मंगरोप येथे काही दिवसांपूर्वी बलबीर नाव्याच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याचे हात आणि पाय वीजेच्या तारेने बांधलेले होते आणि त्याचा गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले होते. परंतु मृत व्यक्तीनेच आपल्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बलबीरने 50 लाखांची विम्याची रक्कम आपल्या कुटुंबीयांना मिळावी यासाठी आपल्याच हत्येचा कट रचला. यासाठी त्याने दोघांना 80 हजार रूपयांची सुपारी दिली. दरम्यान, पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
बलबीरने सुनील यादव नावाच्या व्यक्तीला उत्तर प्रदेशातून बोलावून घेतले होते. यानंतर सुनील यादव याने आपला सोबती राजवीर याच्यासोबत मिळून बलबीरची हत्या केली. यापूर्वी राजवीरने बलबीरसोबत काम केले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. बलबीर याने अनेकांकडून मिळून तब्बल 20 लाख रूपयांचे कर्ज घेतले होते आणि ते पैसे त्याने इतरांना व्याजाने दिले होते. त्यानंतर त्याला मुद्दल मिळत होते, परंतु त्यावरील व्याज मात्र त्याला मिळत नव्हते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तो तणावाखाली होता. त्यानंतर त्याने एका कंपनीतून आपला 50 लाखांचा विमा काढला आणि 8 लाख 43 हजार रूपयांचे प्रमिअमही जमा केला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
यानंतर विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्याने स्वत:चा खुनाचा कट रचला. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी बलबीरने सुनील यादव याला घटनास्थळही दाखवले होते. ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतले आहे ते आपल्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये, यासाठी विम्याची रक्कम आपल्या कुटुंबीयांना मिळावी, अशी त्याची इच्छा होती, असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, विम्याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं बलबीरच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 1:50 pm