राजस्थानातील सत्ता संघर्ष संपुष्टात येण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपानंतर शिगेला गेलेला वाद उच्च न्यायालयात गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून भाजपाकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे. गेहलोत यांनी काही उदाहरण देत तसेच भाजपाच्या नेत्याचं नाव घेत मोदींकडे भाजपा सरकार पाडण्याच्या कृत्यात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

राजस्थानातील सत्ता नाट्य बुधवारी दिल्लीत पोहोचलं. विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या पाठोपाठ सचिन पायलट समर्थकांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालय काय निर्णय घेणार, याची चर्चा सुरू झालेली असतानाच राजस्थान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले आहे. “माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारनं १९८५ मध्ये केलेला पक्षांतर बंदी कायदा आणि त्यात अटल बिहारी वाजपेयी सरकारनं दुरूस्ती करून अंमलात आणलेल्या कायद्याला बाजूला ठेवून मागील काही दिवसांपासून लोकशाही पद्धतीनं स्थापन झालेल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा जनादेशाचा मोठा अपमान आहे. संवैधानिक मूल्यांची उघड उघड अवहेलना आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये झालेले बदल याचं उदाहरण आहे,” असं अशोक गेहलोत यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

“मला या गोष्टीचं नेहमीच वाईट वाटेल की, जेव्हा सामान्य माणसांचा जीव आणि त्यांचा रोजगार वाचवण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची असताना केंद्रात सत्तेत असलेला पक्ष करोना नियंत्रित करण्याच्या प्राथमिकतेला सोडून राज्यातील सरकार पाडण्यासाठी मुख्य भूमिका पार पाडतो आहे. असेच आरोप करोना काळात मध्य प्रदेशात सरकार पाडले त्यावेळी झाले होते आणि तुमच्या पक्षांची देशभर बदनामी झाली होती,” अशी टीका गेहलोत यांनी पत्रातून केली आहे.

“…त्यावेळी सरकार पाडण्याला मी विरोध केला होता”

“सरकार पाडण्याच्या या कृत्यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजपाचे इतर नेते आणि आमच्या पक्षातील काही अतिमहत्वकांक्षी नेतेही सहभागी आहेत. यातील भंवरलाल शर्मांसारख्या वरिष्ठ नेत्यानं घोडेबाजार करून स्व. भैरोसिहं शेखावत यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. पैसेही अनेक आमदारांपर्यंत पोहोचले होते. पण, मी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं तत्कालिन राज्यपाल बल्लिराम भगत आणि पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांना व्यक्तिशः भेटून याचा विरोध केला होता. अशाप्रकारे लोकशाही मार्गानं निवडून आलेलं सरकार पाडणं लोकशाही विरोधात आहे. असं षडयंत्र हे सर्वसामान्य माणसासोबत विश्वासघात आहे,” असं सांगत गेहलोत यांनी भाजपावर टीका केली आहे.