सचिन पायलट यांच्यामुळे राजस्थानमधील राज्य सरकारवर अस्थिरतेचे ढग आले आहेत. दरम्यान सचिन पायलट यांनी आपण भाजपामध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्षष्ट केलं असून यामुळे भाजपा बुधवारी पुन्हा एकदा ‘वेट ऍण्ड वॉच’च्या भूमिकेत गेलं. पण केंद्रीय मंत्री आणि राज्यातील भाजपा नेते गजेंद्र सिंग शेखावत यांनी माघार घेणार नसल्याचे संकेत दिले असून अजून सर्व काही संपलं नसल्याचं म्हटलं आहे. अशोक गेहलोत यांचं सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरेल यासाठी भाजपा शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचं पक्षातील नेत्यांनी सांगितलं आहे.

भाजपा नेत्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट आणि काँग्रेसच्या आमदारांनी गेहलोत सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर काय करता येईल यासंबधी पक्षामध्ये चर्चा झाली आहे. “पण सचिन पायलट यांनी भूमिका स्पष्ट केल्याशिवाय अंतिम चित्र स्पष्ट होणार नाही. तसंच त्यांना कशा पद्धतीचं समर्थन हवं आहे हेदेखील स्पष्ट झालं पाहिजे,” असं भाजपा नेत्याने सांगितलं आहे.

“आम्ही सध्या वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत असून काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला मदत करणार आहोत,” असं भाजपा नेत्याने सांगितलं आहे. “विरोधी पक्ष म्हणून अशोक गेहलोत सरकारचा पराभव होईल याची आम्ही खातरजमा करत आहोत,” असंही ते म्हणाले आहेत. एकीकडे भाजपा नेते सचिन पायलट आपल्या समर्थक आमदारांना घेऊन पक्षात आल्यास ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त करत असून त्यानंतर गेहलोत सरकारला धक्का देण्याची तयारी करत आहेत. मात्र दुसरीकडे सचिन पायलट भाजपा नेत्यांची निराशा करत आहेत. बुधवारी सचिन पायलट यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं असून भाजपा नेत्यांना पुन्हा एकदा संभ्रमात टाकलं आहे.

दुसरीकडे भाजपा नेत्यांनी अशोक गेहलोत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अशोक गेहलोत यांनी भाजपा नेत्यांनी घोडेबाजार केला असून सचिन पायलट यांना सोबत घेऊन सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेते गजेंद्र सिंग शेखावत यांनी इंडियन एक्स्प्रेशी बोलताना सांगितलं आहे की, “जर मुख्यमंत्र्यांकडे त्यांचे उपमुख्यमंत्री घोडेबाजारात सहभागी होते याचे पुरावे आहेतत तर मग ते भाजपाला कशासाठी दोषी ठरवत आहेत ? त्यांना पुरावे मिळाले कुठून ? त्यांनी ते जाहीर करावं आणि भाजपाची माफी मागावी”.

दरम्यान भाजपा सध्या सचिन पायलट यांच्या भूमिकेची वाट पाहत असून एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट यांनी अपक्षांसहित किमान २०-२५ आमदार आणले तर भाजपा पाऊलं उचलण्यास सुरुवात करेल.