राजस्थानमधील राज्य सरकारवरील अस्थिरतेचे ढग अजून काही हटलेले नसून सचिन पायलट आणि काँग्रेस नेत्यांमधील शाब्दिक चकमक अद्यापही सुरु आहे. सचिन पायलट यांनी भाजपा नेत्यांसोबत मिळून राज्य सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप केल्यानंतर अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. उत्तम इंग्लिश बोलणे, हॅण्डसम दिसणे हेच सर्वकाही नसतं अशी उपरोधिक टीका अशोक गेहलोत यांनी केली आहे. सोबतच जयपूरमध्ये घोडेबाजार झाला असून आपल्याकडे पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

भाजपाकडून आमदारांचा घोडेबाजार, २०-२० कोटींना खरेदी केलं जातंय; अशोक गेहलोत यांचा आरोप

“जयपूरमध्ये घोडेबाजार झाला असून आपल्याकडे पुरावे आहेत. आम्हाला १० दिवसांसाठी आमच्या लोकांना हॉटेलमध्ये ठेवावं लागलं. अन्यथा मनेसर येथे जे झालं तेच येथेही होताना दिसलं होतं,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

“मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. नव्या पिढीवर आमचंही प्रेम आहे. शेवटी भविष्य त्यांचंच आहे. नवीन पिढी केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष पद भूषवत आहे. आमच्यावेळी आम्हाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता तो यांनी केला असता तर कळलं असतं,” असंही ते म्हणाले आहेत.

“उत्तम इंग्लिश बोलणे, प्रसारमाध्यमांना चांगले बाइट देणे, हॅण्डसम दिसणे हेच सर्वकाही नसतं. देशासाठी तुमच्या मनात काय आहे, तुमची विचारसरणी, धोरणं आणि कटिबद्धता…प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.