काँग्रसेचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक नवी ऑफर दिली आहे. पक्षश्रेष्ठींची माफी मागून पुन्हा ते पक्षात येऊ शकतात असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. जयपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. “बंडखोर झालेल्यांना ठेवलेल्या अटी तुम्ही सर्वजण पाहू शकता. जर त्यांना परत यायचं असेल तर ते पक्षश्रेष्ठींची माफी मागू शकतात. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी तिसऱ्यांदा ३१ जुलै रोजी अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. गेहलोत सरकारने मंगळवारी अधिवेशन बोलावलं जावं अशी मागणी करणारा प्रस्ताव तिसऱ्यांदा राज्यपालांकडे पाठवला होता. मात्र यावेळी पस्तावावर बहुमत चाचणीचा उल्लेख करण्यास ते विसरले होते. यामुळे राज्यपालांनी प्रस्ताव फेटाळून लावत अधिवेशन बोलावण्यामाहे नेमका काय अजेंडा आहे ते स्पष्ट करावं असं सांगितलं.

राज्यपाल कलराज मिश्र यांनी राज्य सरकारच्या आधीच्या प्रस्तावावर ज्या सूचना केल्या होत्या त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करण्यात आला. विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यासाठी २१ दिवसांची सूचना देणे आवश्यक आहे, असे मत राज्यपालांनी व्यक्त केले होते. त्यावर राजस्थानचे वाहतूक मंत्री प्रताप सिंह यांनी सांगितले की, राज्यपालांनी जे तीन मुद्दे उपस्थित केले होते त्यावर विचार करण्यात आला. विधानसभेचे अधिवेशन केव्हा बोलवायचे याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे त्यामुळे ३१ जुलै रोजी अधिवेशन बोलवावे असा प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात आला होता.

राजस्थान विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला गेला, तर त्यावर बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी काँग्रेसच्या विरोधात मतदान करावे, असा पक्षादेश पक्षप्रमुख मायावती यांनी जारी केला असून ही लोकशाही व राज्यघटनेची हत्या आहे, असे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. बहुजन समाज पक्षाने त्यांच्या सहा आमदारांना पक्षादेश जारी केला असून काँग्रेसच्या विरोधात मतदान करण्यास सांगितले आहे. या सहा आमदारांनी गेल्यावर्षी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.