राजस्थानातील राजकारणानं गुरुवारी नवं वळणं घेतलं. राजस्थानातील भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या अध्यक्षांनी गौप्यस्फोट केला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री व भाजपाच्या नेत्या वसुंधरा राजे या अशोक गेहलोत यांचं सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक दावा आरएलपीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी केला आहे. बेनीवाल यांनी दोन ट्विट करून याचा खुलासा केला आहे.

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेद टोकाला गेल्यानंतर सरकारवर अस्थिरतेचं ढग दाटून आलं आहे. काँग्रेसकडे बहुमत असल्याचा दावा अशोक गेहलोत यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र, गुरूवारी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी गौप्यस्फोट केला.

बेनीवाल यांनी ट्विट करून माजी मुख्यमंत्री व भाजपाच्या नेत्या वसुंधरा राजे यांच्यावरच धक्कादायक आरोप केला आहे. “माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे अशोक गेहलोत यांचं अल्पमतातील सरकार वाचवण्याचे पूर्णपणे प्रयत्न करीत आहेत. राजे यांच्याकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना फोनही करण्यात आले आहेत,” असं बेनीवाल यांनी म्हटलं आहे.

“माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी काँग्रेसमधील त्यांच्या जवळच्या आमदारांशी चर्चा केली आहे. त्यांना अशोक गेहलोत यांना पाठिंबा देण्यास सांगितलं आहे. सीकर व नागौर जिल्ह्यातील प्रत्येक जाट समुदायातील आमदाराला राजे यांनी यांची माहिती दिली आहे. तसेच सचिन पायलट यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत,” असा दावा बेनीवाल यांनी केला आहे.

“अशोक गेहलोत हे जेव्हापासून राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून जाट, गुर्जर व मीणा समुदायातील अनेक वरिष्ठ नेत्यांची हत्या केली आहे. ज्याची उदाहरण जनतेसमोर आहेत,” असंही बेनीवाल यांनी म्हटलं आहे.

सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानातील काँग्रेस सरकार सध्या संकटात सापडले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून बहुमतासाठी आमदारांच्या जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे काँग्रेसनं सचिन पायलट यांना पुन्हा परत पक्षात येण्यात आवाहन केलं आहे.