सचिन पायलट यांनी बंड पुकारलं असून राजस्थान सरकारवरी अस्थिरतेचे ढग अद्यापही कायम आहेत. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून पहिल्यांदाच त्यांनी यावर जाहीर भाष्य केलं आहे. पक्षात मिळत नसलेला सन्मान तसंच लोकांसाठी काम करण्यापासून होणारी अडवणूक अशा अनेक गोष्टींचा खुलासा सचिन पायलट यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

“मी अशोक गेहलत यांच्यावर नाराज नाही. मी कोणतीही विशेष मागणी करत नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की काँग्रेसने निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही बेकायदा उत्खननाविरोधात आवाज उठवला होता ज्यानंतर तत्कालीन भाजपा सरकारने वाटप रद्द केलं होतं. पण सत्तेत आल्यानंतर अशोक गेहलोत त्याच मार्गावर आहेत. अशोक गेहलोत मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासासाठी काम करण्यासाठी जागा आणि मान काहीही देत नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझे आदेश न पाळण्यास सांगण्यात आलं आहे. कोणतीही फाइल माझ्याकडे पाठवली जात नाही. गेल्या कित्येक महिन्यात मंत्रिमंडल बैठक झालेली नाही. जर मी लोकांना दिलेलं आश्वासन पूर्ण करु शकत नसेल तर हे पद काय कामाचं?”.

भाजपा प्रवेशावर सचिन पायलट यांनी जाहीर केली भूमिका, म्हणतात…

“पाच वर्ष पक्षासाठी झटलो, पण गेहलोत मुख्यमंत्री झाले”, सचिन पायलट यांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

“मी हा मुद्दा अनेकदा पक्षासमोर उपस्थित केला. मी राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे आणि इतर वरिष्ठ नेत्यांना याबद्दल सांगितलं होतं. मी अशोक गेहलोत यांच्यासमोरही मांलं होतं. पण मंत्र्यांच्या कोणत्या बैठकाच होत नसल्याने चर्चा किंवा वाद-विवाद होण्याची काही संधीच नव्हती,” असं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. स्वाभिमान दुखावल्यानेच आपण कार्यकारिणी पक्षाच्या बैठकीत अनुपस्थित राहिल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे.

“हे मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी नाही आहे. २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर मी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता हे खरं आहे. पक्षाच्या फक्त २१ जागा असताना मी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली होती. मी लोकांसोबत काम करत असताना पाच वर्षात अशोक गेहलोत यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. पण पक्षाचा विजय होताच अशोक गेहलोत यांनी अनुभवाच्या आधारे मुख्यमंत्रीपदावर दावा केला. पण त्यांचा अनुभव काय आहे ? १९९९ आणि २००९ असं दोन वेळा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. २००३ आणि २०१३ च्या निवडणुकीत त्यांना पक्षाच्या जागा ५६ आणि २६ वर आणल्या होत्या. तरीही त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यात आलं”.

“२०१९ लोकसभा निवडणुकीत अशोक गेहलोत यांनी पक्षाला जास्तीत जागा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्यांच्या मतदारसंघातही उमेदवार निवडून आणू शकेल नाहीत. हा त्यांचा अनुभव आहे. पण तरीही मी राहुल गांधी यांचा त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय मान्य केला. मी नाराज असतानाही राहुल गांधी यांनी आग्रह केल्याने उपमुख्यमंत्रीपद घेतलं. राहुल गांधी यांनी कामात आणि सत्तेत योग्य वाटा देण्यास सांगितलं होतं. पण तरीही अशोक गेहलोत यांनी आपला अजेंडा तयार केला आणि माझा अपमान करत लोकांसाठी काम करण्यापासून रोखत राहिले,” असंही सचिन पायलट यांनी  सांगितलं आहे.