राजस्थानमधील सत्तासंघर्ष अद्यापही सुरु असून अशोक गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचे संकट अद्यापही कायम आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी १०० आमदारांसह शक्तीप्रदर्शन केलं. पण वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करुनही  सचिन पायलट यांनी बंडाचा पवित्रा कायम ठेवला आहे. यादरम्यान सचिन पायलट यांच्या टीमने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये १५ आमदार त्यांच्यासोबत बसले असल्याचं दिसत आहेत. सचिन पायलट यांनी याआधी आपल्याकडे ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं.

या व्हिडीओत सचिन पायलट दिसत नसले तरी आमदार दिसत आहेत. सचिन पायलट यांच्या टीमने ही कोणती जागा आहे याची माहिती दिलेली नाहीत. दरम्यान पायलट आणि गेहलोत यांच्यात समेट घडवण्याचे प्रयत्न सुरुच असून काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची मंगळवारीदेखील बैठक होणार आहे.

काँग्रेसने सुरुवातीला सचिन पायलट यांच्याकडे १६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत त्यांचा दावा फेटाळून लावला होता. नंतर ही संख्या १० ते १२ आमदारांपर्यंत पोहोचली होती. सोमवारी पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीतून १२ आमदार गायब होते. बैठकीनंतर काँग्रेसने १०६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.

काय घडू शकते?

– विधानसभेत १०७ एवढे संख्याबळ असलेल्या काँग्रेसला १३ अपक्षांसह भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आणि राष्ट्रीय लोक दलाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला आहे.
– काँग्रेसच्या दोन तृतीयांश म्हणजे १०७ पैकी ७२ आमदारांनी पक्षांतर केले, तर ते पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचू शकतात. परंतु, एवढय़ा मोठय़ा संख्येने काँग्रेसचे आमदार फुटणे अशक्य असल्याचे मानले जाते.
– भाजपतर्फे सत्ता हस्तगत करण्यासाठी मध्य प्रदेशातील ‘सत्तासूत्रा’चा वापर केला जाऊ शकतो. पायलट यांच्या समर्थक आमदारांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर विधानसभेतील संख्याबळ कमी होईल. त्यानंतर ते आमदार भाजपमध्ये प्रवेश करून पोटनिवडणूक लढवू शकतात.
काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संख्याबळात ५० सदस्यांचा फरक असल्याने भाजपच्या गळाला एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर काँग्रेसचे आमदार लागणे कठीण असल्याचे मानले जाते.

संख्याबळ

एकूण सदस्य- २००

काँग्रेस             १०७
भाजप              ७२
अपक्ष               १३
इतर पक्ष           ८