राजस्थानच्या हदौटी प्रदेशांतील चार जिल्ह्य़ांतील मिळून एकूण १७ मतदारसंघांमध्ये एक डिसेंबर रोजी निवडणूक होत असून यांतील बहुतांशी ठिकाणी उमेदवारांचा भर जातीपातींची समीकरणे जुळविण्यावर दिला जात असून त्याआधारे निवडणूक जिंकण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी कंबर कसली आहे.
हदौटी प्रदेशातील बुंदी या मतदारसंघातून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा काँग्रेसच्या उमेदवार असून भाजपचे स्थानिक आमदार अशोक डोगेरा पुन्हा एकदा रिंगणात आहेत. गेल्या वेळी म्हणजेच २००८च्या विधानसभा निवडणुकीत डोगेरा यांनी ममता शर्मा यांचा १० हजार मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला होता. बुंदी मतदारसंघात जवळपास २.३५ लाख नोंदणीकृत मतदार असून ब्राह्मण समाजाचे वर्चस्व आहे. अशोक डोगेरा यांनी आमदार निधीतील सर्वच्या सर्व ३.८० लाख रुपये विकासकामांसाठी खर्च केल्याचा दावा केला असून त्या जोरावरच आपण पुन्हा निवडून येऊ असे म्हटले आहे.
या दोन प्रमुख उमेदवारांव्यतिरिक्त एनपीपी पक्षाचे भरत शर्मा आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नईमुद्दिन सागर हेही निवडणूक रिंगणात असल्याने ममता शर्मा यांना विजय मिळविणे अवघड बनले आहे.
कोटा उत्तर या मतदारसंघातून राज्यमंत्री शांती धारिवाल पुन्हा एकदा नशीब आजमावणार आहेत. भाजपचे प्रल्हाद गुंजाल त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे मोहम्मद शफी हेही निवडणूक रिंगणात असल्याने धारिवाल यांना मिळणारी मुस्लीम मते मोठय़ा प्रमाणात शफी यांना मिळण्याची दाट शक्यता असून त्यामुळेच दुसऱ्यांदा निवडून येणे धारिवाल यांच्यासाठी आव्हान ठरले आहे.
बारान जिल्ह्य़ातील अ‍ॅन्टा-मंग्रोले मतदारसंघातही काँग्रेस-भाजपमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. हा आदिवासीबहुल भाग असून माजी मंत्री भाजपचे प्रभुलाल सैनी यांना काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री प्रमोद जैन भाया यांच्याशी सामना करावा लागणार आहे. या मतदारसंघातील आदिवासींचा पाठिंबा भाया यांना आहे. परंतु, याच मतदारसंघात ३८ हजार मतदार माळी समाजाचे असून सैनी हेही याच समाजाचे असल्याने निवडणूक लढत तुल्यबळ होऊ शकेल.
कोटामधील लाडपुरा मतदारसंघातून भाजपच्या माजी सरकारमधील संसदीय सचिव भवानी सिंग राजावत यांच्याविरोधात काँग्रेसचे नईमुद्दीन गुड्डू  निवडणूक लढवित आहेत. भवानी सिंग राजावत हे प्रस्थापित आमदार असले तरी गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून लढविलेल्या निवडणुकीत गुड्डू यांचा राजावत यांनी केवळ ७५० मतांचे अधिक्य घेऊन निसटता विजय संपादन केला होता. त्यामुळे ही निवडणूक यंदा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
एक डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार वसुंधरा राजे यांच्या झालरापतन मतदारसंघाचाही समावेश आहे. काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी चंद्रावत असून वसुंधरा राजे सहजपणे निवडणूक जिंकतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.