राजस्थान सरकारने वाढत्या इंधन दरापासून दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी रविवारी राज्यातील पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) ४ टक्क्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यातील इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. राजस्थानही त्याला अपवाद नाही. राजस्थानमधील जयपूर येथे पेट्रोल-डिझेलचे क्रमश: ८३.५४ आणि ७७.४३ रूपये लिटर असा दर आहे.

राज्यात पेट्रोलवर ३० ऐवजी २६ टक्के तर डिझेलवर २२ ऐवजी १८ टक्केपर्यंत व्हॅट कमी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महसुलात २ हजार कोटींची तूट भासेल.

यावर्षी होणार निवडणुका

यावर्षाअखेर चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये राजस्थानचाही समावेश आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्येही निवडणुका होणार आहेत. या राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारही काही प्रमाणात दिलासा देण्याची शक्यता आहे. या राज्यातील निवडणुका होईपर्यंत इंधन दरात कपात होऊ शकते.

कर्नाटक निवडणुकीपूर्वीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २० दिवस कोणताच बदल झाला नव्हता. १२ मे रोजी मतदान झाल्यानंतर लगेचच पेट्रोलच्या दरात ४ रूपयांनी वाढ करण्यात आली होती. तत्पूर्वी १६ जानेवारी ते १ एप्रिलदरम्यानही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेच बदल करण्यात आले नव्हते. त्यावेळी पंजाब, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मणिपूर येथे निवडणुका होत्या.