अडीच महिन्यांच्या लॉकडाउननंतरही करोनाचा प्रार्दुभाव कायम असून, अनेक राज्यांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. गेल्या काही आठवड्यात अनेक राज्यांमध्ये याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, करोना बाधित रुग्णांच्या संख्येत असल्यानं राजस्थान सरकारनं राज्यांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी इतर राज्यांशी जोडलेल्या सीमा एका आठवड्यासाठी बंद करण्यात आल्या आहेत.

करोनाचा प्रसार होत असल्यानं केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात नियंत्रण मिळालं असलं, तरी लॉकडाउन शिथिल केल्यानंतर रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. विशेषतः केंद्र सरकारनं स्थलांतरित मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्याबरोबरच प्रवासी वाहतूक सुरू करण्यास मूभा दिल्यानंतर अनेक राज्यात करोनाचा प्रसार वाढल्याचं दिसून आलं.

आणखी वाचा- करोनाचं संकट, ‘या’ राज्यात झाली पहिल्या मृत्यूची नोंद

राजस्थानमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ११ हजार ३६८ इतका झाला आहे. मागील २४ तासात राज्यात १२३ रुग्ण आढळून आले असून, वाढत्या रुग्ण संख्येला आणि करोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठी राजस्थान सरकारनं राज्याच्या एका आठवड्यासाठी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीवरून पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- “…अन्यथा करोनाचा विजय होईल”, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली भीती

राजस्थानमध्ये आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये आणखी ४० जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर भारतपूरमध्ये ३४, सिकरमध्ये ११, झुनझुनमध्ये ९ यासह इतर जिल्ह्यातही रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थानमध्ये सध्या २ हजार ६१० रुग्णांवर उपचार सुरू असून, ८ हजार १५२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.

आणखी वाचा- करोनामुळे आमदाराचा मृत्यू

प्रवासी वाहतूक सुरू केल्यानं अनेक राज्यांमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून आलं. पश्चिच बंगालमध्ये आकडा वाढत असल्यानं राज्य सरकारनं लॉकडाउन ३० जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मिझोराम सरकारनंही दोन आठवड्यांनी लॉकडाउन वाढवला आहे.