राजस्थान सरकारच्या कामगार विभागाने येथील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक वादग्रस्त आदेश काढला आहे. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पोशाखावर निर्बंध घातले असून कर्मचाऱ्यांना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी घातली आहे. अशाप्रकारच्या कपड्यांमुळे कार्यालयाची प्रतिमा मलिन होते, हे कपडे कार्यालयाच्या प्रतिष्ठेविरोधात आहेत असं या आदेशात म्हटलं आहे.

२१ जून रोजी येथील कामगार आयुक्त गिरिराज सिंह कुशवाहा यांनी काढलेल्या या आदेशानुसार, काही सरकारी कर्मचारी हे कार्यालयांमध्ये जीन्स आणि टी-शर्ट घालून येतात किंवा दुसऱ्या प्रकारचे अशोभनिय पोशाख घालतात, हे कार्यालयाच्या प्रतिष्ठेविरोधात आहे. कर्मचाऱ्यांनी शर्ट-पँट घालून कामावर येण्याचा सल्ला या आदेशामध्ये देण्यात आला आहे.

या आदेशानंतर राजस्थानच्या बहुतांश सरकारी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचारी संघटनेनेही या आदेशाचा विरोध केला आहे. हा आदेश लोकशाहीच्या मुलभूत हक्कांविरोधी आहे, अशी टीका राजस्थान कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष गजेंद्र सिंह राठोड यांनी केली आहे.
यापूर्वी याचवर्षी मार्च महिन्यात राजस्थान सरकारच्या शिक्षण मंडळाने एक अधिसूचना जारी करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड ठरवला होता, सर्वच स्थरातून टीका झाल्यानंतर हा आदेश सरकारला मागे घ्यावा लागला होता.