पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात चुकीचा शब्द प्रयोग करणे राजस्थानमधील काँग्रेस नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. पक्षाने त्या नेत्याचे सदस्यत्वच रद्द करून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान युवक काँग्रेसचे सरचिटणीस ब्रह्मप्रकाश बिश्नोई हे केशवचंद्र यादव यांना राजस्थान युवक काँग्रेसचा अध्यक्ष केल्यामुळे नाराज होते. आपली नाराजी करताना त्यांनी एका व्हॉट्सअप ग्रूपवर राहुल गांधींवर भाष्य केले होते. आज माहीत झालं की, राहुल गांधींना पप्पू का म्हणतात, असा मजकूर त्यांनी ग्रूपवर टाकला होता.

या व्हॉट्सअप ग्रूपवर युवक काँग्रेसचे प्रभारी देवेंद्र कादयान हे होते. बिश्नोई यांचा हा मेसेज लगेच व्हायरल झाला. त्यानंतर सोमवारी (दि.१४) सांयकाळी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. बिश्नोई यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा अपमान केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे पक्षाने म्हटले आहे.

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केशवचंद्र यादव यांना युवक काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. राज्यात युवक काँग्रेसला मजबुती येण्यासाठी राहुल गांधी यांनी यादव यांची निवड केली होती. यादव यांनी यापूर्वी भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना, भारतीय युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. बिश्नोई हे काँग्रेसचे नेते अशोक चांदना यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येते. चांदना यांना अध्यक्षपदाची संधी न दिल्याने ते खूप नाराज होते.

दरम्यान, यापूर्वीही मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यातील नागौद विधासनभा मतदारसंघाचे आमदार यादवेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांचे कौतुक करण्याच्या नादात त्यांना पप्पू म्हटले होते.