जन्माने भारतीय असलेले गोल्डमन सॅकचे माजी संचालक रजत गुप्ता यांची दोन वर्षांच्या तुरूंगवासानंतर सुटका करण्यात आली आहे. ‘इनसायडर ट्रेिडग’च्या आरोपात त्यांनी केलेल्या अपिलावर सुनावणी करण्याचे अमेरिकी न्यायालयाने मान्य केले. गुप्ता (वय ६७) यांची ११ मार्चला मुक्तता करण्यात आली असल्याचे एफबीआयच्या तुरूंग विभागाने सांगितले. गुप्ता यांचा तुरूंगवास १३ मार्चला संपणार होता, पण त्यादिवशी रविवार असल्याने त्यांना शुक्रवारीच सोडण्यात आले. चार वर्षांच्या कायदेशीर लढाईत त्यांना अनेक चढउतार बघावे लागले. हार्वर्डमध्ये शिकलेले गुप्ता यांच्यावर २०१२ मध्ये कंपनीची गोपनीय माहिती त्यांचे उद्योग सहकारी राज राजरत्नम यांना दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांना दोन वर्षे तुरूंगवास व ५० लाख डॉलर्सचा दंड झाला होता व रोखे-विनिमय मंडळाने १.३९ कोटी डॉलर्सचा दंड केला होता. यात राजरत्नम यांना ११ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा झाली होती. गुप्ता यांनी या प्रकरणात अनेक वेळा अपीलही केले होते.