काँग्रेसचे नेते तथा राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या निधनानं रविवारी देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली. करोनाचे उपचार घेत असतानाच राजीव सातव यांना आणखी एका विषाणूचा संसर्ग झाला होता. फुफ्फुसाला झालेला संसर्ग वाढून उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांवर दुःखाचा आघात झाला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक सरल पटेल यांनी त्यांच्याविषयी शेवटची आठवण सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुण्यातील जहांगिर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या खासदार राजीव सातव यांच्यावर काळाने झडप घातली. रविवारी पहाटे पाच वाजता त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक सरल पटेल यांनी सातव यांचा शेवटचा मेसेज शेअर करत भावनांना वाट मोकळी करून दिली.

“राजीव सातव यांच्या निधनामुळे शब्दात व्यक्त करता येणार नाही, असा धक्का बसला आहे. करोना संक्रमणानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. ते नेहमी विनम्र आणि मदतीसाठी तत्पर असायचे. ते लढाऊ नेते होते आणि पक्षासाठी महत्त्वाचे होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. सातव कुटुंबियांच्या दुःखात माझ्या सहवेदना आणि ईश्वर त्यांच्या आत्माला शांती देवो,” सरल पटेल यांनी म्हटलं आहे.

“‘काळजी घे आणि जर काही मदत लागली, तर मला सांगा’, माझ्यासाठी त्यांचा शेवटचा मेसेज होता. त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तेव्हाच त्यांनी हा मेसेज मला पाठवला होता. जेव्हा त्यांच्याविषयी विचारणा करायचो, तेव्हा ‘माझी चिंता सोडा, तुम्ही सांगा कसे आहात,’ असं ते नेहमी म्हणायचे. सर, तुमच्या आत्माला शांती मिळो. तुमची आठवण येत राहिल,” असं म्हणत सरल पटेल यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

करोनाविरुद्धची लढाई जिंकली, पण तरीही काळाने डाव साधलाच

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. त्यांनी करोनावरही मात केली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, फुफ्फसात संसर्ग वाढल्याने प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.