अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, यानंतर बजाज ऑटोचे प्रमुख राजीव बजाज यांनीदेखील वाहिन्यांसंबंधी एक वक्तव्य केलं आहे. जाहीरातींसाठी तीन वाहिन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती बजाज यांनी दिली.

एक सशक्त ब्रँड हा एक पाया आहे, ज्यावर आपण मजबूत व्यवसाय बनवता, असं बजाज म्हणाले. तसंच कंपनी कोणत्याही द्वेषबुद्धीला आणि समाजात विष परसवणाऱ्या मानसिकतेला मान्यता देत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान त्यांनी कोणत्या तीन वाहिन्यांवर बंदी घातली याबाबत मात्र माहिती दिली नाही. त्यांनी सीएनबीसी टीव्ही १८ शी साधलेल्या संवादादम्यान याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा- TRP Scam: ‘दुपारी दोन तास चॅनेल पाहण्याचे ५०० रुपये मिळत होते,’ साक्षीदाराचे धक्कादायक खुलासे

आमची टीम द्वेषबुद्धीनं काम करणाऱ्या वाहिन्या आणि वृत्तपत्रांची नावं काढत आहेत. व्यवसायावर त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम झाला तरी आम्ही त्या माध्यमांचं समर्थन करू शकत नसल्याचंबी बजाज म्हणाले. जे समाजात विषमता पसरवतात अशा कोणत्याही ब्रँडशी आपण जोडलो गेलो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- TRP घोटाळा : ‘रिपब्लिक’ की ‘इंडिया टुडे’; FIR मध्ये नक्की कोणाचं नाव?, पोलीस म्हणतात…

काय आहे विषय?

टीआरपी नोंदविणाऱ्या हंसा रिसर्च ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना विश्वासात घेऊन खोट्या नोंदी तयार करून टीआरपीचा गैरप्रकार केला. या घोटाळ्याचा सुगावा हंसा रिसर्च ग्रुपला जून महिन्यात लागला. त्यानंतर ग्रुपने यातील आरोपी भंडारी याला कामावरून कमी केले होते. हंसा ग्रुपने केलेल्या तक्रोरीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. अटक आरोपी भंडारी, मेस्त्री यांच्या चौकशीतून रिपब्लिकसह अन्य वाहिन्यांचा टीआरपी कृत्रिमरीत्या वाढविण्यात आल्याची माहिती पुढे आल्याचा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

आणखी वाचा- समजून घ्या : TRP म्हणजे काय आणि तो कसा मोजतात?

घोटाळा कसा?

बीएआरसीने केबल किंवा डिशद्वारे वाहिन्यांचे प्रक्षेपण विकत घेणाऱ्या तीन हजार ग्राहकांच्या घरी टीआरपी मोजण्यासाठी गुप्तपणे यंत्रणा बसवली. बीएआरसीने या कामासाठी हंसा रिसर्च ग्रुपची निवड केली. त्यातील अधिकाऱ्यांनी यांतील दोन हजार ग्राहकांना विश्वासात घेतले. महिन्याकाठी किरकोळ रक्कम देण्याच्या आमिषावर ग्राहकांना दिवसभर किंवा दिवसातील काही ठरावीक तास ठरावीक वाहिन्या सुरू ठेवण्यासाठी तयार केले. या कृतीमुळे मिळालेल्या नोंदींआधारे अपेक्षित असलेल्या ठराविक वाहिन्यांचे टीआरपी वाढवण्यात आले.