माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील सात आरोपींची सुटका करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयावरून गुरुवारी लोकसभेत काँग्रेस आणि अभाअद्रमुकच्या सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली.सर्वोच्च न्यायालयाने केवळ तीन जणांची सुटका करण्याबाबतचे मत व्यक्त केले असताना सर्व आरोपींची सुटका करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री जे. जयललिता राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे संजय निरुपम यांनी केला. तेव्हा अभाअद्रमुकचे सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयाच्या मताशी आम्ही सहमत नाही; परंतु तामिळनाडूच्या मुख्यमंत्री सातही जणांची सुटका करून राजकारण करीत आहेत. आरोपींना ठोठावण्यात आलेली शिक्षा त्यांनी भोगावी. तामिळनाडू सरकारने पूर्णपणे अन्याय केला आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
या प्रकाराने संतप्त झालेल्या अभाअद्रमुकच्या सदस्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरू केली तेव्हा त्यांची काँग्रेसच्या सदस्यांशी शाब्दिक चकमक झडली. अभाअद्रमुकचे सहकारी पक्ष जद(यू) आणि सपाचे सदस्य त्यापूर्वीच मोकळ्या जागेत आले होते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.