माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या हा देशाच्या आत्म्यावर झालेला हल्ला होता. गांधी यांची हत्या करणाऱ्या आरोपींची सुटका केल्यास ती न्यायाच्या सर्व तत्त्वांच्या विरोधातील कृती होईल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारने आरोपींेच्या सुटकेबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.  कोणतेही सरकार अथवा राजकीय पक्षाने दहशतवादाविरोधात मवाळ भूमिका घेऊ नये, असेही डॉ. सिंग म्हणाले. आरोपींना सोडण्याची तामिळनाडू सरकारची कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असेही त्यांना सांगण्यात आल्याचे पंतप्रधानांनी एका निवेदनात म्हटले आहे.
करुणानिधींचा वेगळा सूर
आरोपींच्या सुटकेचा प्रश्न सत्तारूढ अण्णाद्रमुकने योग्य पद्धतीने हाताळला नसल्याची टीका द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी केली आहे. योग्य नियोजनाच्या अभावामुळे या सरकारकडून योग्य पद्धतीने प्रश्नांची तड लागत नाही, असेही करुणानिधी यांनी म्हटले आहे.