आदर्श राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात ते भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज निधन झाले. १९५२ पासून निवडणूक लढवलेल्या वाजपेयींनी राजकारणात कोणावरही वैयक्तिक चिखलफेक केली नाही. राजकारणात मानवी मूल्यांच्या बाजूने ते होते. स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकारणात सर्वाधिक काळ असणाऱ्या नेहरू-गांधी परिवाराबरोबरील त्यांच्या संबंधावरून हे स्पष्ट होते. वैचारिक मतभेद असले तरी गांधी कुटुंबीयांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

१९८७ मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे किडनीशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. आर्थिक अडचणींमुळे वाजपेयींना त्यावेळी अमेरिकेत उपचार करणे शक्य नव्हते. त्याचवेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना याबाबत समजले. त्यांनी वाजपेयींना आपल्या कार्यालयात बोलावले. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला न्यूयॉर्कला जाणाऱ्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश करत असल्याचे वाजपेयींना सांगितले. या संधीचा लाभ घेऊन त्यांनी आपल्यावर उपचार करावेत असा सल्लाही दिला. या प्रसंगाचा उल्लेख प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘द डेविल्‍स अॅडवोकेट’ या पुस्तकात उल्लेख आहे. थापर यांनी १९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या हत्येनंतर वाजपेयींनी एका कार्यक्रमात सार्वजनिकरित्या ही माहिती सांगितले. मी न्यूयॉर्कला गेलो आणि त्यामुळेच मी आज जिवंत आहे, असे वाजपेयी थापर यांना म्हणाले होते.

जेव्हा न्यूयॉर्कमध्ये उपचार करून ते भारतात परतले. तेव्हा दोन्ही नेत्यांनी याचा कुठेच उल्लेख केला नाही. वाजपेयींनी पत्र लिहून राजीव गांधी यांचे आभार मानले होते. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर स्वत: वाजपेयींनी करण थापर यांच्या ‘आय विटनेस’ या कार्यक्रमात सांगितले होते.