नक्षलवाद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राजीव गांधींप्रमाणे हल्ला करण्याचा कट होता की काय अशी शंका निर्माण करण्यात येत आहे. जानेवारीमधल्या कोरेगाव भीमाप्रकरणी पुणे पोलिसांनी नक्षलवादी असल्याचा संशय घेत पाच जणांना अटक केली होती. या संदर्भात चौकशी केली असता सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी विशेष न्यायालयात सांगितले की अटक केलेल्यांकडे जे साहित्य सापडले त्यावरून बंदी असलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) राजकीय हत्येचा कट रचत होती. पवार यांनी सांगितले की सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन व रोना विल्सन हे शस्त्र खरेदीच्या प्रयत्नात होते. यासाठी . या पाचही जणांचे घनिष्ठ संबंध असलेली सीपीआय (एम) निधी पुरवणार होती. कोर्टाकडे आरोपींची पोलिस कोठडी मागताना या सगळ्यांविरोधात हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा असल्याचेही पवार यांनी सांगितले.

विल्सन यांच्या घरातून हस्तगत केलेल्या एका पत्रात राजीव गांधींवर झालेल्या हल्ल्याप्रमाणे हल्ला करण्याचा संदरभ आहे. राजीव गांधी भारताचे माजी पंतप्रधान असल्याचा संदर्भ लक्षात घेता व सध्याचे वातावरण बघता हा हल्ल्याचा कट नरेंद्र मोदींच्या विरोधात असू शकेल का असा संशय घ्यायला जागा आहे. अर्थात, पवार यांनी कोर्टात तशी शंका स्पष्टपणे नाव घेऊन व्यक्त केलेली नाही. पत्रामध्ये आत्मघातकी हल्ल्याचा संदर्भ असून एम-4 गन व तब्बल चार लाख गोळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

सीपीआय (एम) ने 31 डिसेंबर रोजी पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यासाठी अर्थसहाय्य केले होते. खेरीज गडलिंगव शोमा हे भविष्यातील खर्चाची तरतूद करण्यास सक्षम असल्याचे पवार यांनी सांगितले. बचाव खात्याने मात्र हा सगळा खटला बनावट असल्याचा आरोप केला. वेगळ्या लोकांसाठी वेगळी फूटपट्टी लावण्यात येत असल्याचा आरोपही सध्याच्या सरकारवर बचाव पक्षाने केला आहे. पाचही आरोपींना 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

कॉम्रेडच्या पत्राचा हवाला देत भाजपचा गंभीर आरोप

देशात बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांशी काँग्रेसने हातमिळवणी केली असून २०१९ मध्ये मोदी सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी संघटना दलितांचा हत्यारासारखा वापर करत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप भाजपनें काँग्रेसवर केला आहे. गेल्या वर्षी झालेले भीमा-कोरेगावमध्ये झालेले आंदोलन उत्स्फूर्त नव्हते, तर शहरी नक्षलवादी संघटनांनी कृत्रिमरीत्या घडवून आणले होते, असा भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.

या आरोपामागील पुरावा म्हणून पात्रा यांनी कॉम्रेड रोना विल्सन यांना कॉम्रेड एम या नावाने लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. ‘कमिटी फॉर रिलिज ऑफ पॉलिटिकल प्रिझनर’ (सीआरपीपी)च्या वतीने लिहिले अहे. कॉम्रेड रोना यांना बुधवारी नवी दिल्लीतून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही या पत्राचा उल्लेख झाला होता. पुणे पोलिसांकडेही संबंधित पत्र असल्याचा दावा पात्रा यांनी केला. या पत्रात नक्षलवाद्यांना काँग्रेस गुप्तपणे मदत करत असून देशात अराजक माजवण्याचा कट करण्यात आला असल्याचा दावाही पात्रा यांनी पत्रकार परिषदेत केला.