फाशीची शिक्षा झालेल्या १५ आरोपींची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कमी केल्यामुळे राजीव गांधी हत्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या तीन आरोपींनाही या निकालाचा फायदा होऊ शकतो, असे ‘एमडीएमके’चे नेते वायको यांनी मंगळवारी येथे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतातून फाशीच्या शिक्षेचे उच्चाटन करण्याचा मार्ग खुला झाला आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणाशी संबंधित सुनावणी येत्या २९ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार असल्याचे वायको यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर या तिघांना ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा आता कमी होईल, असा विश्वास वाटत असल्याचे ते म्हणाले. तामिळी नागरिकांचा खंदा समर्थक अशी एमडीएमकेची राज्यात ओळख आहे.
‘एशियन सेंटर’कडून निकालाचे स्वागत
गुवाहाटी : १५ गुन्हेगारांची शिक्षा कमी करून ती जन्मठेपेवर नेण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे ‘एशियन सेंटर फॉर ह्य़ुमन राइट्स’ या संघटनेने मंगळवारी स्वागत केले. फाशीची शिक्षा रद्द करण्याच्या दृष्टीने भारताने याद्वारे इंचभर तरी प्रगती केली आहे आणि फाशीची शिक्षा कायमस्वरूपी रद्द करण्यासंदर्भात आता भारताने एकदाच कायमचा निर्णय घ्यावा, असे आवाहन संघटनेचे संचालक सुहास चकमा यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा परिणाम ४१४ गुन्हेगारांच्या शिक्षेवर होणार आहे. हे गुन्हेगार देशाच्या विविध कोठडय़ांमध्ये २०१२ पासून आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त आकडेवारी उत्तर प्रदेशची असून तेथील ६३ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. महाराष्ट्रात हीच संख्या ५१ असून बिहार व दिल्ली येथे अनुक्रमे ४२ आणि २७ गुन्हेगार तुरुंगात आहेत. अन्य राज्यांतील गुन्हेगारांची आकडेवारी अशी- पंजाब (१६), केरळ (१४), तामिळनाडू (१२), तर आसाम, काश्मीर व मध्य प्रदेशात फाशीची शिक्षा झालेले प्रत्येकी १० गुन्हेगार तुरुंगांत आहेत, असे चकमा यांनी सांगितले.