करोनानं देशात शिरकाव केल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. लॉकडाउन लागू झाल्यापासून काँग्रेस भाजपाविरोधात आक्रमक होताना दिसत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे नेतेही मोदी सरकारवर टीका करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख न करता काँग्रेसनं पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे.

राजस्थानातील राजकीय संघर्षानंतर काँग्रेसनं भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींसह भाजपावर टीका करताना दिसत असून, काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते राजीव सातव यांनी एक शेर ट्विट करून पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.

वो भी शामिल था, ‘बहार-ए-वतन’ की लूट में,

फक़ीर बन के आया था वो, लाखों के सूट में ।

हा शेर ट्विट करून राजीव सातव यांनी मोदींवर टीका केली आहे. लाखो रुपयाच्या सूटमध्ये फकीर म्हणून आलेली व्यक्तीही देशाला लुटण्यामध्ये सहभागी होती, असा या शेरचा अर्थ असून, सातव यांनी यातून अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला आहे.

यापूर्वीही राजीव सातव यांनी मोदींवर चीनच्या मुद्यावरून टीका केली होती. “चीनसोबतच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौन अंचबित करणार आहे. मोदीजी, ही मन की बात नसेल पण देशाची बात आहे. तुम्ही देशासमोर सत्य आणलं पाहिजे. मोदीजी, भारताच्या सीमेवर काय होत आहे, हे सगळं देशासमोर आणा,” असं राजीव सातव यांनी ट्विट करून म्हणाले होते.