जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करण्यापासून भाजप चार हात लांब राहण्याची शक्यता दिसत असली, तरी पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या दोन्ही राज्यांमध्ये भाजपच सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
जम्मू-काश्मीरमधील विजयासाठी भाजपने आखलेले मिशन ४४+ तूर्ततरी अपयशी ठरले असल्याचे दिसते आहे. स्वबळावर भाजप इतक्या जागा जिंकण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतरही सत्तास्थापन करण्याबाबत पक्षाच्या नेत्यांना विश्वास आहे. जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यांतील मतमोजणी सध्या सुरू आहे. भाजपला जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगले यश मिळत असल्याचे चित्र दिसते आहे. पण स्वबळावर सत्ता स्थापन करण्यापासून भाजप दूरच राहणार असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर संसद भवनाबाहेर पत्रकारांना राजनाथसिंह म्हणाले, या दोन्ही राज्यांमध्ये आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत.
सत्ता स्थापन करण्यासाठी इतर कोणत्या पक्षांना सोबत घेणार, याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.