केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर खोऱ्यातील युवकांसाठी नवी प्रेरणा जागृत करणाऱ्या नबील अहमद वानीचे कौतुक केले आहे. जम्मू काश्मीरमधील उद्यमपूर शहरातील नबील वानीने  यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या पात्रता परिक्षेच्या गुणवत्ता यादीत अव्वल मानांकन मिळविले आहे. काश्मीर खोऱ्यातील हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानी  बुरहान वानीवरील लष्करी कारवाईनंतर काश्मीर खोरे धुमसत असताना नबील वानीने मिळविलेले यश काश्मीरमधील दगड उचलणाऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरु शकते.

नबील यांच्या भेटीनंतर राजनाथ सिंह यांनी देशातील सुरक्षिततेचा आढावा घेतला. या सर्वसाधारण बैठकीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे सल्लागार अजित डोवल गुप्तचर विभागाचे प्रमुख दिनेश्वर शर्मा , केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आयुक्त के के शर्मा यांच्यासह गहमंत्रालयाचे सचिव अनिल गोस्वामी उपस्थित होते. राजनाथ सिंह यांची ही बैठक गृहमंत्रालयाच्या नियमित कामकाजाचा भाग असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली. गृहमंत्री राजनाथ सिंह काही दिवसांपासून बाहेरच्या दौऱ्यावर असल्याने गृहमंत्रालयाची बैठक लांबल्याची माहिती देखील गृहमंत्र्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

काश्मीर खोऱ्यातील बुरहान वानी याच्यासह दोन दहशतवादी चकमकीत मारले गेल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराची परिस्थिती अजून देखील कायम आहे. त्यामुळे ही बैठक काश्मीरमधील अशांततेदर्भातही महत्त्वपूर्ण समजली जाते. काश्मीर खोऱ्यातील शांततेसाठी यापूर्वी राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ३० सदस्यांच्या सर्वपक्षीय शिष्टाचारमंडळाने काश्मीर दौरा केला होता. मात्र फुटीरतावाद्यांच्या आडमुठेपणामुळे शिष्टमंडळाचा हा दौरा फारसा प्रभावी ठरला नव्हता.