तणीगंभीर परिणामांचा गर्भित इशारा देण्यापर्यंत तणा; उद्धव यांच्याशी राजनाथांची चर्चा

अर्थमंत्री अरुण जेटली व शहरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांची आग्रही विनंती धुडकावून शिवसेना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नोटाबंदीविरोधातील मोर्चामध्ये सहभागी झाल्याने भाजपचा चांगलाच तिळपापड झाला आहे. सत्तेत असूनही विरोधकांच्या मोर्चात सामील झाल्यास गंभीर परिणाम होतील, असा शिवसेनेला गर्भित इशारा देण्यापर्यंत भाजपची मजल गेल्याचे समजते. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी चर्चा केली. मात्र, उद्धव यांनीही पक्षाच्या भूमिकेचे ठामपणे समर्थन केले.

बॅनर्जी यांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती भवनवर काढलेल्या मोर्चामध्ये अन्य विरोधी पक्ष नव्हते; पण सत्तेतील शिवसेना होती. शिवसेनेला ममतांसोबत सामील होण्यापासून परावृत्त करण्यासाठी बुधवार सकाळपासूनच जेटली आणि नायडू शिवसेनेचे केंद्रातील प्रतिनिधी आणि अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या संपर्कात होते. मात्र, ‘तुम्ही माझ्याशी बोलून काही उपयोग नाही. निर्णय घोषित झालेला आहे.

आता जर तो बदलायचा असेल तर स्वत: मोदींनी उद्धवजींशी चर्चा केली पाहिजे,’ असे गीते म्हणत होते आणि ते अखेपर्यंत त्यावरच अडून बसल्याने जेटली व नायडूंचा भलताच हिरमोड झाला. शेवटी तर, ‘विरोधकांशी हातमिळवणी केल्यास गंभीर परिणाम होतील,’ असा गर्भित इशारा देण्यापर्यंत गरमागरम चर्चा झाली. त्यावर गीतेंनीही तसेच प्रत्युत्तर दिले.’ असे आम्हाला कोठले चांगले खाते तुम्ही दिलेय? असले खाते असले काय आणि नसले काय.. ते काढून घ्यायचे असेल तर घ्या काढून,’ असे एरवी शांत व संयमी असलेल्या गीतेंनीच सुनावल्यानंतर मग जेटली व नायडूंचा नाइलाज झाला. या खडाजंगीनंतर शिवसेनेचे २१पैकी सात खासदार ममतांबरोबर सहभागी झाले. पण स्वत: गीतेंनी जाण्याचे टाळले. त्याऐवजी सभागृहात बसणे त्यांनी पसंत केले. लोकसभेतील नेते आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या अवजड खात्यावर बोळवण केल्याचाही शिवसेनेमध्ये राग आहे.

गृहमंत्र्यांचा दूरध्वनी

गीतेंच्या सूचनेप्रमाणे स्वत: मोदींनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला नाही; पण राजनाथ सिंह बोलले. भाजपचे बोचलेपण त्यांनी ठाकरेंच्या कानावर घातल्याचे समजते.

याउलट उद्धव यांनी नोटाबंदीच्या निर्णयास विरोध नसल्याचे स्पष्ट केले; पण जर अयोग्य नियोजनामुळे जनतेची ससेहोलपट होणार असल्यास शिवसेना गप्प बसणार नसल्याचेही सांगितले. ‘जर मोदी शरद पवारांसोबत व्यासपीठावर जाऊ  शकतात, तर आम्ही ममतांबरोबर जाण्यास काय हरकत आहे?,’ असाही युक्तिवाद केला. त्यावर, मोदी-पवार हे बिगर-राजकीय कार्यक्रमासाठी एकत्र आल्याकडे राजनाथांनी लक्ष वेधले.

अगोदरच ताणलेले संबंध असलेल्या भाजप व शिवसेनेमधील मतभेदांची दरी नोटाबंदीमुळे अधिकच रुंदावली आहे. जनतेच्या रांगांवरून शिवसेना मोदींवर कठोर टीका करीत आहे.

नोटांच्या निर्णयाचे समर्थन – उद्धव ठाकरे

राष्ट्रपती भवनावरील ‘मोर्चा’त सहभागी झालेल्या शिवसेनेची भूमिका केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मवाळ झाली आहे. ५०० व एक हजारच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे ठाकरे यांनी समर्थन केले असून त्याच्या अंमलबजावणीतील अडचणींमुळे सर्वसामान्यांना त्रास होत असल्याबद्दल गुरुवारी नाराजी व्यक्त केली.