News Flash

काश्मीरमध्ये हस्तक्षेप करू नका!.

खोऱ्यात उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४७ जण ठार झाले आहेत.

| July 25, 2016 02:07 am

भारत पाकिस्तान सीमारेषा लागून असलेल्या चार राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी बैठक घेतली.

राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले; शांतता प्रस्थापित करण्यासाठी खोऱ्यातील जनतेला आवाहन

काश्मीर सध्या धुमसत असले तरी समग्र देशवासीयांना काश्मीर पुन्हा एकदा स्वर्ग झालेले पाहायचे आहे. त्यामुळे काश्मिरातील जनतेने पुढाकार घेऊन खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच खोऱ्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी तिसऱ्या घटकाची  गरज नाही, त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याचे उद्योग करू नये, अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकला ठणकावले.

हिजबुलचा दहशतवादी बुरहान वानी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्यापासून काश्मीर खोरे धुमसत आहे. खोऱ्यात उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ४७ जण ठार झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर राजनाथसिंह दोन दिवसांपासून काश्मीरमध्ये तळ ठोकून होते. खोऱ्यात शांतता नांदावी यासाठी आम्ही कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, त्याआधी काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येणे गरजेचे असून त्यासाठी जनतेने सरकारला सहकार्य करावे असे आवाहन राजनाथ यांनी केले. दोन दिवसांचा दौरा आटोपल्यानंतर राजनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काश्मिरी जनतेला शांततेचे आवाहन करतानाच पाकिस्तानलाही खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे इरादे ‘पाक’ नाहीत, असे स्पष्ट करत पाकिस्तान स्वतच दहशतवादाचा बळी ठरत असताना तेथील राज्यकर्ते काश्मिरी तरुणांना शस्त्र हाती घेण्यासाठी चिथावत आहेत. पाकिस्तानचे हे नापाक इरादे आम्ही सहन करणार नाही,  असे राजनाथ यांनी सुनावले.

सुरक्षा दलांना संयम पाळण्याच्या सूचना

सुरक्षा दलांनी छऱ्याच्या बंदुकांचा वापर टाळत संयम पाळण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत. काश्मिरी तरुणांनीही वारंवार सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न थांबवावेत व खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राजनाथ यांनी यावेळी केले. दरम्यान, सुरक्षा दलांना विशेषाधिकार देणारा कायदा (अफस्पा) खोऱ्यात तात्पुरता उठवावा, अशी मागणी काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राजनाथ यांच्याकडे केली.  पाकिस्तानशी काश्मीरच्या मुद्दय़ावरून चर्चा करणे सुरूच ठेवावी अशी सूचना नॅशनल कॉन्फरन्सने केली. तर राजनाथ यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे काँग्रेसने मात्र पाठ फिरवली.

आम्हाला काश्मिरी जनतेशी गरजेपुरते नव्हे तर भावनिक संबंध हवे आहेत. खोऱ्यात शांतता नांदावी अशी समग्र देशवासीयांची इच्छा आहे.

– राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 2:04 am

Web Title: rajnath singh comments on kashmir issue
Next Stories
1 वाघांच्या संख्येबाबत सदोष पद्धतींमुळे गोंधळ
2 इराकमध्ये आत्मघाती हल्ल्यात बारा जण ठार
3 ‘जीएसटी’ या आठवडय़ात राज्यसभेत?
Just Now!
X