पॅरिस : फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांशी आपली फलदायी चर्चा झाली असून त्यात दोन्ही देशातील द्विपक्षीय संरक्षण सहकार्यातील सर्व मुद्दय़ांचा समावेश होता, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. सध्या ते तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर  आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहिले राफेल विमान ताब्यात घेण्याच्या निमित्ताने शस्त्रपूजा केल्यानंतर भारत— फ्रान्स यांच्यातील वार्षिक संवादात भाग घेतला. फ्रान्सच्या समपदस्थ फ्लॉरेन्स पार्ली यांच्याशी त्यांनी संरक्षणविषयक द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा केली. राजनाथ सिंह यांचे हॉटेल द ब्रिनी येथे फ्रान्सच्या लष्करी दलांनी स्वागत केले. एलिसी पॅलेस येथे त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशीही चर्चा केली. भारत- फ्रान्स यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी या बैठकीत सर्वंकष चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, फ्रान्स व भारत यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य हे मोलाचे आहे. दोन्ही देशांचा उत्साह त्यामुळे वाढला आहे. फ्लॉरेन्स पार्ली यांच्या भेटीत संरक्षण मुद्दय़ांवर चर्चा झाली. राफेल जेट विमानांसाठी इंजिने तयार करणाऱ्या सॅफ्रान या फ्रान्सच्या बहुराष्ट्रीय कंपनीला राजनाथ सिंह यांनी भेट दिली.

राफेल  विमानातून भरारी घेऊन परतल्यानंतर राजनाथ सिंह यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२१ पर्यंत किमान १८ राफेल विमाने भारताला मिळालेली असतील व उर्वरित विमाने एप्रिल—मे २०२२ पर्यंत मिळतील.

भारताने फ्रान्सबरोबर केलेल्या करारात एकूण ३६ राफेल विमाने दिली जाणार असून त्यात भारतीय हवाई दलाने सुचवलेल्या १३ सुधारणांचा समावेश आहे. ही विमाने पंजाबमधील अंबाला, पश्चिम बंगालमधील हासिमरा येथील तळांवर तैनात केली जाणार आहेत. हवाई दलाचे उपप्रमुख हरजित सिंग अरोरा यांनी सांगितले की, सीमेवर रक्षणासाठी ही विमाने मोठी भूमिका पार पाडणार आहेत. त्यांची क्षमता पाकिस्तानच्या एफ १६ विमानांच्या दुपटीहून अधिक आहे.