गृहमंत्र्यांच्या उत्तरावर काँग्रेसचा सभात्याग

देशात विविध ठिकाणी होत असलेल्या मॉबलिंचिंगचा केंद्र सरकार निषेध करते. अलीकडे फेक न्यूज देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून अफवा पसरवल्या जातात. त्याविरोधात राज्य सरकारांनी प्रभावी कारवाई केली पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले. पण, गृहमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.

शून्य प्रहरात काँग्रेसचे खासदार वेणुगोपाल यांनी मॉबलिंचिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे, ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. वेणुगोपाल यांच्या प्रश्नावर उत्तर देताना राजनाथ म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी असली तरी केंद्र सरकार शांत बसलेले नाही. मॉबलिंचिंगविरोधात कारवाई केली जात आहे. २०१६ मध्ये आणि जुलै २०१८मध्ये केंद्र सरकारकडून यासंबंधी लोकांनी सावधगिरी बाळगण्यासंदर्भात परिपत्रक (अ‍ॅडव्हाजरी) जारी करण्यात आली आहे.

समाजमाध्यमांवरून अफवा पसरवल्या जातात. समाजमाध्यमांच्या सेवापुरवठादारांनी (प्रोव्हायडर) असे प्रकार रोखण्यासाठी यंत्रणेचा समावेश करावा अशी सूचना करण्यात आली आहे. मॉबलिंचिंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन राजनाथ यांनी दिले. मात्र, काँग्रेसच्या सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला. लिंचिंगचे प्रकार भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत अधिक होत असून त्याची जबाबदारी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राजनाथ यांनी स्वीकारली पाहिजे, अशी टीका काँग्रेसनेते आनंद शर्मा यांनी सभागृहाबाहेर केली.