निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खोऱ्यातील सुरक्षा उपायांमध्ये वाढ

जम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गोंधळ घालण्याचा कट पाकिस्तानने आखला असून, सुमारे २५० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात सुमारे ३०० दहशतवादी सक्रिय असून, सुमारे २५० दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. काश्मीर खोऱ्यात शिरून दहशतवादी कारवाया करण्याचा आणि निवडणुकामंध्ये विघ्न आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती लष्करी गुप्तहेरांना मिळाली आहे. त्यामुळे भारतीय सैन्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी लष्कराने चोख तयारी ठेवली आहे. लष्करासह पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल व स्थानिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

दहशतवाद्यांना खोऱ्यात शिरकाव करता येऊ नये यासाठी लष्कराने टेहळणी व गस्त वाढवली आहे. निवडणुका शांततेत तसेच सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, जम्मू- काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी मतदान होणार आहे. या निवडणुका सुरक्षित वातावरणात व्हाव्यात यासाठी सुरक्षा दलांनी नियोजनपूर्वक आखणी केली आहे. वाहनांची तपासणी, संशयितांची झडती आणि शहरात तसेच खोऱ्यातील इतर भागांमधील गस्त यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

श्रीनगर शहरात अनेक तपासणी नाके उभारण्यात आले असून तेथे वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी प्रशिक्षित श्वानांचीही मदत घेतली जात आहे. कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची आमही काळजी घेत आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.

काश्मीर आमचेच- राजनाथ सिंह</strong>

काश्मीर हे आमचेच असून, जगातील कोणतीही शक्ती त्याला आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. जलद कृतीच्या दलाचा (रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स- आरएएफ) २६वा वार्षिक दिन समारंभ येथील सीआरपीएफ तळावर झाला. आरएएफच्या कृती जलद राहाव्यात, मात्र कधीही ‘निष्काळजी’ असून नयेत, असे याप्रसंगी गृहमंत्री म्हणाले. दंगल, कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न हाताळण्यासोबतच मदत व बचाव कार्यात जलद कृती दल अग्रेसर असते, असे सांगून राजनाथ सिंह यांनी केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) कामाचे कौतुक केले.