जम्मू : नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांनी निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केल्याच्या पाश्र्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायतींच्या आगामी निवडणुकांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सर्व राजकीय पक्षांना केले.

केंद्र सरकारने घटनेच्या ३५अ या कलमाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याचे सांगून नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी या दोन मोठय़ा क्षेत्रीय पक्षांनी आपण या निवडणुकांमध्ये भाग घेणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सिंह यांनी हे आवाहन केले आहे.

सर्व राजकीय पक्षांनी राजकीय प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन मी करू इच्छितो. त्यामुळे त्यांना लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, असे गृहमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले.

१९५४ सालच्या राष्ट्रपतींच्या आदेशान्वये घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या कलम ३५अ अन्वये जम्मू व काश्मीरच्या नागरिकांना विशेष हक्क  आणि विशेषाधिकार देण्यात आले आहेत. राज्याबाहेरील व्यक्तीशी विवाह करणाऱ्या महिलेला या कलमान्वये मालमत्तेचा हक्क नाकारण्यात आला आहे. या कलमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, संबंधित याचिका अद्याप न्यायालयाच्या विचाराधीन आहे.