जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारतीय जवानांना दररोज ५-६ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश येत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबारालाही भारतीय जवान जशात तसे उत्तर देत आहेत, असेही ते म्हणाले. ‘भारताकडून पहिल्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन होऊ देऊ नका. मात्र पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास, त्यांना संपूर्ण ताकदीने प्रत्युत्तर द्या,’ अशा सूचना जवानांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डोकलामच्या मुद्यावरही भाष्य केले. ‘भारत आता कमकुवत देश राहिलेला नाही. भारत आता एक सामर्थ्यशाली देश झाला आहे. चीनविरुद्धचा वाद संपुष्टात आणण्यासाठी भारत समर्थ आहे,’ असे सिंह म्हणाले. ‘दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळ चाललेला डोकलाममधील सीमावाद भारताने कशाप्रकारे हाताळला, हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. भारत जर कमकुवत देश असता, तर डोकलामचा तिढा सुटला नसता,’ असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले.

भारत आणि चीनचे सैन्य जून ते ऑगस्टदरम्यान आमनेसामने उभे ठाकले होते. सिक्कीम सीमेवरील डोकलाममध्ये १६ जूनपासून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा तणाव ७३ दिवसांनंतर २८ ऑगस्टला निवळला. चिनी सैन्याने भारत, चीन आणि भूतान सीमेवरील डोकलाम भागात रस्त्याचे काम सुरु केल्याने या वादाला सुरुवात झाली. डोकलामचे स्थान भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्याने भारतीय सैन्याने या रस्त्याच्या कामाला आक्षेप घेतला. त्यामुळे दोन महिने भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. अखेर २८ ऑगस्टला दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून हा वाद संपवला.