.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल लडाखचा दौरा केल्यानंतर आज जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड पोस्टला भेट दिली. राजनाथ सिंह यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बीपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणेसोबत होते.

कुपवाडा जिल्ह्यातील एलओसी जवळील फॉरवर्ड पोस्टला राजनाथ यांनी भेट दिली. तिथे तैनात असलेल्या जवानांसोबत संवाद साधला. कुठल्याही परिस्थितीत सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या या शूर सैनिकांचा आम्हाला भरपूर अभिमान आहे असे टि्वट राजनाथ सिंह यांनी केले. राजनाथ सिंह यांनी या दौऱ्याचे फोटो आणि सैनिकांसोबत संवाद साधल्याचे व्हिडीओ टि्वट केले आहेत.

फॉरवर्ड पोस्टवर जाण्याआधी त्यांनी पवित्र अमरनाथ गुंफेला भेट दिली. तिथे त्यांनी अमरनाथाचे दर्शन घेतले. इथे मंदिर परिसरात ते तासभर होते. राजनाथ सिंह दोन दिवसीय जम्मू-काश्मीर आणि लडाख दौऱ्यावर होते. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सुरक्षा स्थितींचा आढावा घेतला.

‘भारताची एक इंचही जमीन सोडणार नाही’
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावाही घेतला. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी जवानांना संबोधित केलं. तसंच चीनलाही कठोर शब्दात इशारा दिला. “भारताच्या एक इंचही जमिनाला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही,” असं ते यावेळी म्हणाले. त्यांनी आज जवानांशी संवाद साधला आणि त्यांचं मनोबलही वाढवलं.

“जर भारताच्या स्वाभिमानावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यांना योग्य भाषेत उत्तरही दिलं जाईल. सध्या भारत आणि चीनदरम्यान जी काही चर्चा झाली ती सकारात्मक आहे. या प्रकरणाचा तोडगा निघाला पाहिजे. परंतु हा तोडगा कुठपर्यंत निघेल याची सध्या कोणतीही हमी मी आता देऊ शकत नाही,” असं ते लडाखमधील लुकुंग चौकीवर भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित करताना म्हणाले.