खासदार राजू शेट्टी यांच्या नव्या राजकीय नाटकाचा तिसऱ्या अंकाचा पडदा उघडला आहे. पहिल्या अंकात त्यांनी ‘केंद्रातील सत्तेला पाठिंबा दिला. दुसऱ्या वेळी सत्तेतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिट्ठी दिली. आणि आता पुरोगामी लोकशाही आघाडीशी हातमिळवणी केली. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांची राजू शेट्टी यांनी नवी दिल्लीत घेतलेली भेट नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरली आहे. सत्ताधाऱ्यांशी संबंध तोडून विरोधकांशी साधलेली जवळीक ही शेट्टी यांचा आगामी राजकीय प्रवास कसा असणार हे अधोरेखित करण्यास पुरेशी ठरली आहे.

उसाच्या मळ्यात फुललेले नेतृत्व म्हणजे राजू शेट्टी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी त्यांनी कृष्णा-पंचगंगाकाठी संघर्ष केला. त्यातून शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद, विधानसभा आणि लगेचच संसद असा राजकीय भाग्योदय त्यांच्या भाळी  होता. शिवार ते संसद असा दोनदा प्रवास करणाऱ्या शेट्टी यांना संसदेत जाण्याची हॅटट्रिक करण्याचे वेध लागले आहेत.

शेट्टी यांच्या बदलत्या राजकीय भूमिका

मुळात राजू शेट्टी यांच्या राजकीय भूमिकेत सातत्याचा अभाव आहे. त्यांच्या भूमिका दरवेळी बदलत राहिल्या. ज्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकीय आणि चळवळीची मुळाक्षरे गिरवली त्या शरद जोशी यांच्याशी त्यांचे वैचारिक मतभेद झाले. जोशी हे जातीयवादी भाजपशी सलगी साधतात, असे म्हणत त्यांनी पुरोगामी विचारांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. पुरोगामी पक्षांची सोबत घेऊनच शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तत्कालीन खासदार निवेदिता माने यांना पराभूत करून पहिला विजय मिळवला. तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेसविरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली. शरद पवारांची बारामती असो की पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड तेथे ऊस दराचे टोकदार आंदोलन केले. त्यांचा लढाऊबाणा गोपीनाथ मुंडे यांना भावला. पुढे मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे शेट्टी भाजपप्रणीत महायुतीत सहभागी झाले. याच युतीच्या मदतीने त्यांनी गतवेळी काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यावर विजय मिळवला. आणि आता शेट्टी यांनी राहुल गांधी यांच्याशी जवळीक साधली आहे.

भाजपशी वैचारिक मतभेद

मागील लोकसभा निवडणूक प्रचारावेळी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शेती मालाला दीडपट हमीभाव देण्याचे अभिवचन दिले होते. काँग्रेसकडून अपेक्षाभंग झालेले शेट्टी हे मोदींच्या या मुद्दय़ामुळे प्रभावित झाले होते. परंतु, अवघ्या तीन वर्षांत मोदी सरकारकडूनही त्यांचा अपेक्षाभंग झाला. सरकार शेतकऱ्यांच्या भल्याचे निर्णय घेत नसल्याने ते नाराज होते. अशातच भाजपने शेट्टी यांच्या न कळत त्यांचे जवळचे मित्र सदाभाऊ खोत यांना आपल्याकडे खेचले. खोत यांच्याबाबतीत विधान परिषद, राज्यमंत्री, मंत्रिपदाच्या जबाबदारीत वाढ अशा गोष्टी करीत भाजपने शेट्टी यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या डावपेचामुळे खोत हे शेट्टी यांना डोईजड झाले. दोघांतील वाद टोकाला जाऊन त्याची परिणती खोत यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी होण्यात झाला. खोत यांनी रयत क्रांती संघटनेकडून शेट्टी यांच्यावर तोफ डागण्यास सुरुवात केली. भाजपपासून दुरावलेल्या शेट्टी यांनी नवी राजकीय समीकरणे आखण्यास सुरुवात केली. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक वाढली. साखर कारखानदारांशी जोरदार वाद घालण्याऐवजी त्यांचे प्रश्न दिल्लीदरबारी मांडण्यास सुरुवात केल्याने सहकारसम्राटांचा रागही कमी झाला. काँग्रेसलाही सरकारच्या कामगिरीचे वाभाडे काढणारे कणखर नेतृत्व हवेच होते, ते शेट्टी यांच्या रूपाने गवसले. ही संधी काँग्रेसने आधी साधली. गेल्या डिसेंबर महिन्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शेट्टी यांच्या शिरोळमधील निवासस्थांनी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. ही भेट घडवून आणण्यात आमदार सतेज पाटील यांचा पुढाकार होता. या वेळी शेट्टी यांनी गतवेळी ज्यांना पराभूत केले ते माजी मंत्री प्रकाश आवाडे हेही उपस्थित होते. आवाडे यांनी जिल्हा परिषद निवडणूक स्वाभिमानीशी आघाडी करून लढवीत मैत्रीचा नवा अध्याय सुरू केला. चव्हाण-शेट्टी यांची ती भेट तेव्हा फारशी चर्चेत राहिली नाही पण तेव्हा झालेले बीजारोपण आता दिल्लीत अंकुरताना दिसले.

भाजप विरोधात मोट

सत्तेची गोड फळे चाखायला मिळण्याऐवजी कटुपणाचा अनुभव अधिक आल्याचे दु:ख शिवसेना आणि स्वाभिमानीला अधिक आहे. दोन्ही पक्षात फसवले गेल्याची भावना प्रबळ बनली आहे. त्यामुळे या दोन्ही समदु:खी पक्षातही सख्य वाढले आहे. त्यातून भाजपच्या विरोधात मोहीम उघडण्यात शेट्टी यांचा पुढाकार राहिला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांसह शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून पुरोगामी संघटना या सर्वाशी जवळीक साधत भाजपविरोधात आक्रमक राहण्याची नीती शेट्टी यांनी आरंभली आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्य शेट्टी यांचा काटा काढण्यावर आहे. त्यासाठी तोडीस तोड उमेदवार शोधण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. भाजपकडून सर्वशक्तीनिशी प्रतिकार होणार याचा अंदाज असल्याने अधिकाधिक मित्र वा मैत्रीचे नाते निर्माण करून संसद गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे, अलीकडेच झालेली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट, त्यांच्यासमवेत काढलेली संविधान रॅली आणि आताची राहुल गांधी यांची भेट हे शेट्टी यांच्या मित्र जोडण्याच्या प्रयत्नांचे नवे पाऊल होय!