28 November 2020

News Flash

राज्यराणी एक्स्प्रेसला अपघात

उत्तर प्रदेशात रामपूरजवळ डबे घसरून दोन जखमी

| April 16, 2017 01:42 am

मेरठ-लखनौराज्य राणी एक्स्प्रेस गाडीचे आठ डबे शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील रामपूर येथे घसरून झालेल्या दुर्घटनेत   दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशात रामपूरजवळ डबे घसरून दोन जखमी; घातपाताची शक्यता 

मेरठ-लखनौराज्य राणी एक्स्प्रेस गाडीचे आठ डबे शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील रामपूर येथे घसरून झालेल्या दुर्घटनेत   दोन प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमागे घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगण्यात येत असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

मुंडापांडे व रामपूर स्थानकादरम्यान रेल्वेचे डबे घसरले, असे उत्तर रेल्वेचे प्रवक्ते नीरज शर्मा यांनी सांगितले. दोन प्रवासी यात जखमी झाले असून कुणीही मरण पावलेले नाही. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी गेले असून वेगाने मदतकार्य सुरू आहे. मोरादाबाद विभागीय रेल्वे व्यवस्थापक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी गेले आहेत. पोलिसांनी आधी दिलेल्या माहितीनुसार पंधरा जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मदतकार्य वेगाने करावे व त्यामध्ये मुख्य सचिव व गृह खात्याचे मुख्य सचिव यांनी देखरेख करावी, असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिले आहेत. मोरादाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रमोद कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी गेले आहेत. दरम्यान, एटीएसचे पोलीस महानिरीक्षक असीम अरुण हे त्यांच्या पथकासह रामपूरला गेले आहेत. नोईडाचे एटीएसचे ब्रीजेश कुमार रामपूरला गेले असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे.

रामपूर जंक्शनपासून दोन किमी अंतरावर व कोसी नदीच्या पुलापासून १०० मीटर अंतरावर हा अपघात झाला. रामपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा जण जखमी झाले असून त्यांच्यापैकी तिघे गंभीर जखमी आहेत. अमित कटियार व मेघ सिंह अशी दोघा जखमींची नावे आहेत. सात जणांना उपचारानंतर जिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले.

नुकसानभरपाई

अपघातातील गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा सुरेश प्रभू आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केली. आपण स्थितीवर वैयक्तिकपणे लक्ष ठेवले असून ज्येष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले आहेत, असे प्रभू यांनी ट्वीट केले आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रभू यांनी समाजमाध्यमांवरही स्पष्ट केले आहे. आदित्यनाथ यांनी गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची, तर किरकोळ जखमींना प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आर्थिक मदत जागेवरच वितरित करण्याचे आदेश आदित्यनाथ यांनी जलसंधारणमंत्री बलदेव ओलाख यांना दिले आहेत.

रेल्वेमार्गाला तडे

एक्स्प्रेसचे आठ डबे ज्या ठिकाणी घसरले तेथील लोहमार्गाचा तीन फूट लांबीचा भागच जागेवर नसल्याचे आढळल्याने या दुर्घटनेमागे घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले. रामपूरचे पोलीस अधीक्षक के. के. चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा त्यांना लोहमार्ग तुटल्याचे, त्याचा काही भाग गाडला गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दुर्घटनेमागे घातपात असल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

दिल्लीत सूत्रांनी सांगितले की, प्रथमदर्शनी हा अपघात रेल्वे मार्गाला तडे गेल्याने झाल्याचे दिसत आहे. वेल्डिंग करण्यात आलेला भाग तुटल्याचे दिसत आहे, मात्र चौकशीनंतरच कारण निश्चित होईल, असे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 1:42 am

Web Title: rajya rani express derailment indian railways
Next Stories
1 व्हॉट्सअॅपवरील संदेश मागे घेणे शक्य!
2 आंतरखंडीय क्षेपणास्त्रांसह उत्तर कोरियाचे शक्तिप्रदर्शन
3 चित्रफितींमुळे काश्मिरात तणाव
Just Now!
X