गुजरातमधील यंदाची राज्यसभा निवडणूक काँग्रेस आणि भाजपमधील दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे कधी नव्हे इतकी रंगतदार झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू अहमद पटेल यांचा विजय काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. मात्र, भाजपनेही आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मनोबल खच्ची करण्यासाठी अहमद पटेल यांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. या निवडणुकीत अहमद पटेलांचा पराभव झाल्यास काँग्रेस पक्षाच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. काँग्रेसला हवे असल्यास अहमद पटेल यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी ममतांनी दाखवली होती. मात्र, राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयाने दिली आहे. अहमद पटेल यांनी पश्चिम बंगालमधून राज्यसभेची निवडणूक लढवल्यास त्यांनी घरच्या मैदानातून पळ काढला, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खालावू शकते. त्यामुळेच राहुल गांधी यांनी ममतांचा प्रस्ताव नाकारल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सहा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे दिले होते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेसनं आपल्या ४२ आमदारांना रातोरात विमानाने बंगळुरूच्या एका रिसॉर्टमध्ये हलवले होते. मात्र, प्रकारामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत अहमद पटेल यांच्या विजयाचा मार्ग खडतर असल्याची कबुली खुद्द काँग्रेसच्या गोटातून देण्यात आली आहे. काँग्रेस आमदार राघवजी पटेल यांनीच अहमद पटेल यांचा विजय कठीण असल्याचा दावा केला होता. याशिवाय, आगामी काळात काँग्रेसचे आणखी २० आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. या आमदारांनी राजीनामे दिले तर अहमद पटेल या राज्यसभेवर निवडून जाणे अशक्य आहे. मी अलिकडेच अहमद पटेलांना भेटलो होतो. पक्षातील सध्याच्या परिस्थितीबाबत आपण त्यांना सावधही केले होते. तसेच राज्यसभेची निवडणूक न लढवण्याची विनंती केल्याचा दावाही राघवजी पटेल यांनी केला होता.