राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून पुन्हा राज्यसभेत प्रवेश केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्या एका विधानावरून गुरूवारी राज्यसभेत गदारोळ झाला. स्वामींनी बुधवारी सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आरोपामुळे याआधीच संतप्त झालेल्या काँग्रेस खासदारांनी स्वामींच्या या विधानावर आक्रमक पवित्रा घेतला. सुब्रमण्यम स्वामी यांच्या टिप्पणीवर आक्षेप घेत विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी स्वामी रस्त्यावरची भाषा राज्यसभेत बोलत असल्याची चपराक लगावली. स्वामींविरोधात घोषणाबाजी करत काँग्रेसचे खासदार हौदात उतरले. अखेर, राज्यसभा उपाध्यक्ष पी जे कुरियन यांनी हस्तक्षेप करून स्वामींचे विधान कामकाजातून वगळण्यात येईल, असे सांगत वादावर पडदा पाडला.
स्वामी यांनी आपले विधान मागे घेईपर्यंत तुम्हाला सभागृहात बोलूच देणार नाही, अशी उघड धमकीच काँग्रेसने दिली. यानंतर सभागृहाचे कामकाज थांबविण्याची वेळ आली. दोन दिवसांत दोन वेळा स्वामी यांचे वक्तव्य संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे.