माजी सपा नेते  आणि राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. उत्तर प्रदेशातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. तेव्हापासून ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशनही करण्यात आले होते. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

अमर सिंह हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले होते. समाजवादी पक्षापासून फारकत घेतल्यानंतर ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ते आजारी होते. त्याआधी त्यांची जवळीक भाजपासोबत वाढली होती. १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती.

बिग बी अमिताभ बच्चन यांचे आणि त्यांचेही चांगले संबंध होते. मात्र या दोघांमध्ये काही मतभेदही झाले होते. ज्यानंतर यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांची माफीही मागितली होती.

२००२ आणि २००८ या वर्षांमध्येही ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. एसपी नेते मुलायम सिंह यादव आणि अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाशी अमर सिंह यांचा घनिष्ठ परिचय होता. गेल्या काही कालावधीपासून या नात्यांमध्ये कटुता आली होती. मात्र या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती. त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ संदेशरही प्रसारित केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमर सिंह यांना आदरांजली वाहिली आहे. अमर सिंह हे एक उत्साही राजकारणी होते. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. एक चांगला माणूस आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमर सिंह यांना आदरांजली वाहिली आहे.