राज्यसभेत अल्पसंख्य असलेल्या केंद्र सरकारला बिजद, तेदप व शिवसेनेच्या मदतीने खाण व खनिज तसेच कोळसा विधेयक मंजूर करण्यात यश मिळाले. प्रवर समितीने खाण व खनिज विधेयकात सुचवलेली एक दुरुस्ती स्वीकारण्यात आली. हे विधेयक अत्यंत घाईने मंजूर केले जात असल्याचा आरोप करीत जदूय सदस्यांनी सभात्याग केला. खाण व खनिज विधेयक ११७ विरुद्ध ६९ मतांनी मंजूर झाले. काँग्रेस, भाकप, माकपच्या सदस्यांनी या विधेयकास तीव्र विरोध केला होता. कोळसा विधेयकामुळे खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या हक्कावर गदा येईल, असा आरोप करीत डाव्या पक्षांनी या विधेयकासही विरोध केला. मात्र अखेरीस कोळसा विधेयक १०७ विरुद्ध ६२ मतांनी मंजूर झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र आज संपले. अखेरच्या दिवशी आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वाची ठरणारी ही दोन्ही विधेयके सत्ताधाऱ्यांनी मंजूर करवून घेतली.सकाळच्या सत्रात खाण व खनिज विधेयक मंजूर करण्यात आले. दुपारनंतर कोळसा विधेयकावर चर्चा झाली. झारखंड मुक्ती मोर्चा, बिजू जनता दल, अण्णाद्रमुक सदस्यांनी विधेयकास समर्थन दिले.