नवी दिल्ली :संसदीय समितीमध्ये चर्चा केल्याविनाच फेसबुकच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यामागील आपला हेतू जाहीर करणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याविरुद्ध माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला  यांच्याकडे पत्र पाठविले आहे.

चर्चेसाठी कोणाला पाचारण करण्यात येणार आहे आणि कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे याबाबत निवेदन जारी करण्याची गरजच नव्हती आणि ते लोकसभेच्या पद्धतीचे उल्लंघन करणारे आहे. शशी थरूर हे संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी याबाबत प्रथम माध्यमांशी बोलणे हे समितीमधील सदस्यांना आणि समितीलाच कमी लेखण्यासारखे आहे, असे राठोड यांनी गुरुवारी वार्ताहरांना सांगितले.

देशातील नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी समितीला ज्याला पाचारण करावेसे वाटेल त्याला पाचारण करण्याबाबत समिती सदस्यांची हरकत नव्हती, परंतु त्याबाबत प्रथम समितीमध्ये चर्चा व्हावयास हवी होती, असे राठोड यांनी सांगितले.

पदावरून दूर करण्याची भाजप खासदार दुबे यांची विनंती

थरूर यांच्याविरोधात भाजपचे खासदार निशिकान्त दुबे यांनीही गुरुवारी आक्रमक पवित्रा घेतला आणि थरूर यांना संसदीय समितीच्या अध्यक्षपदावरून दूर करावे, अशी विनंती करणारे पत्र दुबे यांनी लोकसभेचे अध्यक्षांना पाठविले. दुबे हे या समितीचे सदस्य आहेत, त्यांनी लोकसभेच्या नियमांकडे बोट दाखवून थरूर यांच्याऐवजी अन्य कोणत्याही सदस्याला समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली आहे.