शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला लवकरच एव्हिएशन सेक्टरमध्ये गुंतवणूक करणार आहेत. त्यांच्या कंपनीत ७० विमानं असणार आहेत. पुढच्या चार वर्षात ही कंपनी उभी राहणार आहे. भारतातील जास्तीत जास्त लोकांनी विमान प्रवास करावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या कंपनीत जवळपास ३.५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याच त्यांचा विचार आहे. या कंपनीत त्यांचा ४० टक्के वाटा असणार आहे. पुढच्या १५ ते २० दिवसात एव्हिएशन मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. येणाऱ्या काळात विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

झुनझुनवाला यांच्या कंपनीचं नाव अकासा एअर असं असणार आहे. स्वस्त दरात विमान प्रवास उपलब्ध करून देण्याचा झुनझुनवाला यांचा प्रयत्न आहे. तसेच एका विमानातून १८० जण प्रवास करतील, अशी विमानं खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असं झुनझुनवाला यांनी ब्लूमबर्ग टेलीविजनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या कंपनीत अमेरिकेच्या डेल्टा एअरचे माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Video: आत्मनिर्भर..! ८०व्या वर्षीही कष्ट करून स्वत:च्या पायावर उभी असणारी आजी

करोनामुळे जगातील विमान कंपन्यांची वाईट स्थिती आहे. सध्या देशातील विमान कंपन्यांची स्थिती चांगली नाही. जेट एअरवेज इंडिय लिमिटेडला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. यासाठी दोन वर्षे विमानसेवा बंद होती. त्यानंतर इंडिगो आणि स्पाइसजेट या कंपन्यांनाही नुकसान सहन करावं लागलं आहे. तिसऱ्या लाटेत पुन्हा एकदा या क्षेत्रावर टांगती तलवार आहे. त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांच्या निर्णयाकडे उद्योग जगताचं लक्ष लागून आहे.