मूळचे भारतीय वंशाचे आणि हार्वर्ड महाविद्यालयातील नेतृत्वविकास व समाजशास्त्र या विषयांचे प्राध्यापक राकेश खुराणा यांची हार्वर्डच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा १ जुलै रोजी ते पदभार स्वीकारतील.
व्यवस्थापनशास्त्राचे गाढे अभ्यासक असलेले खुराणा यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या ‘फॅकल्टी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’मध्ये काही काळ समाजशास्त्र विषयात प्राध्यापकी केली तर आता माविन बोवर अध्यासनात नेतृत्व विकास या विषयाचे प्राध्यापक म्हणून ते हार्वर्डमध्येच कार्यरत आहेत. ‘फॅकल्टी ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’ विभागाचे प्रमुख मायकल स्मिथ यांनीच खुराणा यांच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्याचा ई-मेल महाविद्यालय व्यवस्थापनाला पाठवला. खुराणा यांची प्राध्यापकीय कारकीर्द देदिप्यमान तर आहेच शिवाय त्यांचा नेतृत्वविकास व समाजशास्त्र अभ्यासही गाढा आहे. त्यांच्या या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग हार्वर्डमधील विद्यार्थ्यांना नक्की होईल असे स्मिथ यांनी त्यांच्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. आफ्रिकी व अमेरिकी आफ्रिकी लोकजीवनाच्या गाढय़ा अभ्यासक एव्हलिन हॅमंड्स या गेल्या वर्षी १ जूनला हार्वर्ड महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदावरून पायउतार झाल्या. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी आता खुराणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हार्वर्ड महाविद्यालय व्यवस्थापनाने आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीने मी कृतकृत्य झालो आहे. माझ्या सर्वच सहयोगी प्राध्यापकांच्या सहकार्याने मी माझी जबाबदारी योग्यरित्या निभावण्याचा आटोकाट प्रयत्न करेन.
    – राकेश खुराणा, हार्वर्डचे नवे डीन