नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत आहेत, अशी टीका आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार राघव चड्ढा यांनी केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतीविषयक कायद्यांबद्दल दिल्ली सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला होता. त्यांना प्रत्युत्तर देतांना चड्ढा यांनी टीका केलीए. संसदेने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांची आज वर्षपूर्ती असून त्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.

नवज्योत सिंद्धू यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की “दिल्ली सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तीन कृषी कायद्यांपैकी एका कायद्याची अंमलबजावणी सुरू केली होती आणि शेतकऱ्यांना बाजारसमित्यांच्या बाहेर शेतमाल विक्रीला परवानगी दिली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा आदेश मागे घेतलाय का हे सांगावं?”असा सवाल केला होता.

यावर उत्तर देतांना चड्ढा म्हणाले की, “नवज्योत सिद्धू हे पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत आहेत. तसेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात ट्विट केल्याबद्दल काँग्रेस हायकमांडकडून पीपीसीसी प्रमुखांना फटकारण्यात आलंय. त्यामुळे आज ते अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. उद्यापर्यंत थांबा, कारण ते पुन्हा कॅप्टन यांच्यावर टीका करणं सुरू करतील,” असे चड्ढा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, या ट्विटनंतर राघव चड्ढा यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. एकेकाळी आपमध्ये असलेल्या आणि आता काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्या अलका लांबा यांनी म्हटलं की, चड्ढा यांच्या वक्तव्यामुळे आपची महिलांप्रती मानसिकता दिसून आली आहे. आपची मानसिकता आणि विचारसरणी आरएसएस सारखीच आहे. लांबा यांनी दयनीय राजकारणाचे प्रदर्शन म्हणत चड्ढा यांना “संघी चढ्ढा” म्हटलंय.