रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थीला डोळ्यासमोर ठेवून रविवारी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी राख्या आणि गणेशमुर्तीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) काढून टाकला आहे. त्यामुळे आता राख्या आणि गणेश मुर्तीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्री पियूष गोयल यांनी नवी दिल्लीमध्ये आज याची घोषणा केली. ‘येणाऱ्या रक्षाबंधनला राखीला जीएसटीमधून वगळले आहे. म्हणजे आता राखीवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाही. त्याबरोबरच गणेश मुर्तीलाही जीएसटीमधून वगळले आहे.’ याशिवाय हस्तशिल्प आणि हँडलूमलाही जीएसटीमधून वगळण्यात आले आहे.’ असे प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्थमंत्री पियूष गोयल म्हणाले.

दरम्यान,  केंद्र सरकार जीएसटीचा टॅक्स स्लॅब 14 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे केंद्र सरकार 28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करण्याचा विचार करत असताना दुसरीकडे 12 आणि 18 टक्क्यांचा टॅक्स स्लॅब रद्द करुन एकच 14 टक्क्यांचा स्लॅब करण्याचा विचार सरकार करत आहे.